देवेंद्र फडणवीस : 'नवनीत राणांना जेलमध्ये गुन्हेगारांनाही वागणूक दिली जात नाही तशी दिली गेली' | पुढारी

देवेंद्र फडणवीस : 'नवनीत राणांना जेलमध्ये गुन्हेगारांनाही वागणूक दिली जात नाही तशी दिली गेली'

नागपुर, पुढारी वृत्तसेवा : खासदार नवनीत कौर-राणा यांना कारागृहात गुन्हेगारांनाही अशी वागणूक दिली जात नाही, ती वागणूक दिली आहे. या सरकारने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर रविवारी माध्यमांशी बोलताना दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी काल लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन राणा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान नवनित कौर राणा यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या घोषणा केली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यानंतर १३ दिवसांनी दोघेही तुरूंगातून जामीनावर सुटले. दरम्यान कारागृहात त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. मात्र मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ समोर आणून राणा खोटे बोलत असल्याचे, स्पष्ट केले होते. नवनीत राणा यांना मानेचा त्रास जाणवत असल्याने जामीनानंतर त्या थेट लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या होत्या, त्यानंतर आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button