नाशिक : नातवाला वाचविण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज | पुढारी

नाशिक : नातवाला वाचविण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दुगारवाडी धबधब्याजवळच असलेल्या दुगारवाडी वस्तीत मंगळवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून लहान मुलावर झडप घेत त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र, त्याचवेळी घरात असलेल्या आजीने धाडसाने बिबट्याशी मुकाबला केल्याने नातवाचे प्राण वाचले. जखमी नातवावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बिबट्याने थेट घरात प्रवेश करत एका लहान मुलावर हल्ला केला. यात रोशन बुधा खाडम हा सहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आजीसह नातू रोशन घरात असताना अचानक बिबट्याने घरात प्रवेश केला. बिबट्याने रोशनवर हल्ला करत त्यास मानेला दात लावत बाहेर फरफटत घेऊन जात असताना तेथे असलेल्या आजीने हातातील लाकूड बिबट्याच्या दिशेने भिरकावले. तसेच, बिबट्यावर धावून गेली. आरडाओरडा करत त्याच्या मागे धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने धरलेल्या लहान मुलाला तेथेच टाकून धूम ठोकली.

आजीच्या आरडाओरड्याने काही क्षणात गावकरी जमा झाले. रोशनच्या मानेला जखम झालेली पाहून त्यास तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दुगारवाडी परिसरात नोव्हेंबर महिन्यातदेखील दोन लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.

बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. ग्रामस्थ शेतात कामासाठी जाण्यासदेखील घाबरत आहेत. मुलांना शाळेत जाता-येताना धोका निर्माण झाल्याने शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. तर दुसरीकडे वनविभाग अद्यापही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची नाराजी आहे.

हेही वाचा ;

Back to top button