भाजपचा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला; देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडले | पुढारी

भाजपचा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला; देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आझाद मैदानातून मोर्चा काढला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशीष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारला घेरले. भाजप नेत्यांच्या भाषणानंतर हा मोर्चा निघाल्यानंतर मेट्रो सिनेमाजवळ अवडण्यात आला.

मोर्चा विधानभवनापर्यंत नेण्याचा अट्टाहास केल्याने पोलीसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे, प्रसाद लाड तसेच सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आदी नेत्यांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून देण्यात आले. नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीसांकडून मोर्चा थांबवण्याचे आवाहन करण्यात आले, पण भाजपकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

देवेंद्र फडणवीस यांची विचारणा

दरम्यान, नवाब मलिकांचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नवाब मलिकांच्या राजीनामा घेईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला. हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का ? अशी विचारणा त्यांनी केली.

२५ रुपये चौरस फुटाने जागा घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नवाब मलिक जोवर राजीनामा घेणार नाहीत, तोवर संघर्ष तीव्र करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने यावेळी भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

नवाब मलिकांचा राजीनामा अचानक थांबला : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात २७ महिन्यात संजय राठोडांचा राजीनामा घेतला यात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, अनिल देशमुखांवर ईडीने कारवाई केली यांचा राजीनामा घेतला. तसेच मलिकांवर कारवाई झाली त्यांचा राजीनामा मंजूर होणार होता, त्यांची जागा घेण्यासाठी नेता तयार होता, पण त्यांचा राजीनामा अचानक थांबला त्यांचा राजीनामा दाऊदमुळे थांबला. यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत, हे सरकार दाऊदच्या पाठींब्यावर चालत आहे. या सरकारला शेतकऱ्यांची पडलेली नाही त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलल यांनी केली.

हे ही वाचलं का ?

 

Back to top button