पुणे : ससेवाडी येथील खून प्रकरणी पश्चिम बंगालच्या एकाला जन्मठेप | पुढारी

पुणे : ससेवाडी येथील खून प्रकरणी पश्चिम बंगालच्या एकाला जन्मठेप

पुणे, पुढारी वृत्तसेवा : दारू पिऊन घराचा दरवाजा वाजविल्याचा राग मनात धरून एकाला कटावणीने मारहाण करून त्याचा खून करणार्‍या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी जन्मठेप आणि २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. रोनिन माणिक सरकार (रा. उत्तरकेसपूर, ता. कुमारगंज, जि. दखनदिनासपुर, पश्चिम बंगाल) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. युकील मुनदारी (वय ५५, रा. सिमोलीया ता. निसचिंतापुर, २४ परगणा, पश्चिम बंगाल) यांचा खून करण्यात आला होता. याबाबत सतीश नामदेव मादळे (वय ४८, रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली होती . खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले.

फिर्यादी हे कॉन्ट्रॅक्टर असून भोर येथील ससेवाडी मधील युनिव्हर्सल कॉलेजचे काम त्यांनी जून २०१५ पासून घेतले होते. तेथेच त्यांनी कामगारांच्या राहण्यासाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या होत्या. तेथे आरोपी रोनिन आणि त्याचे इतर कामगार मित्र राहत होते. त्याच्याच बरोबर राहणार्‍या सुजलबरोबर त्याचा एक मित्र युकील मुनदारी लेबर कॅम्प येथे आला होता. २८ जुलै २०१५ रोजी रात्री अकराच्या सुमारास त्याने लेबर कॅम्प मधील राजू गंवडी याच्या घराचा दरवाजा मद्यधुंद अवस्थेत वाजविला होता. त्याचा राग येऊन रोनिनने कटावणीने मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला.

न्यायालयात तब्बल सात वर्षे खटला (life imprisonment) चालला. हवालदार सचिन अडसूळ आणि उमेश जगताप यांनी दोन साक्षीदारांना पश्चिम बंगाल येथून आणून साक्षीसाठी हजर केले. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. अ‍ॅड. खान यांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी केला. राजगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक उपनिरीक्षक विद्याधर निचित, अमंलदार मंगेश कुंभार यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : “अजून खूप शिखरं गाठायचीयंत” – अमृता खानविलकर | Power Women | International Women’s Day 2022

Back to top button