औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा क्रांतीचौकात विराजमान | पुढारी

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा क्रांतीचौकात विराजमान

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन अश्वारुढ पुतळा आज पहाटे क्रांतीचौकात विराजमान झाला. ३१ फूट उंच चौथऱ्यावर हा २१ फूट उंच पुतळा बसविण्यात आला आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा आहे. लवकरच या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी क्रांती चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला.  महापालिकेने आधीचा पुतळा काढून तिथे शिवरायांचा नवीन उंच पुतळा बसविण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला हाेता. त्याचवेळी चौथऱ्याच्या कामासाठी जुना पुतळा काढून घेण्यात आला हाेता. आता क्रांती चौकात ३१ फूट उंच नवीन चौथरा बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासोबतच काही दिवसांपासून पुणे येथे चित्रकल्पक आर्ट येथे शिवरायांचा २१ फूट उंच पुतळा बनविण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यावर रविवारी मध्यरात्री हा पुतळा मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवून क्रांती चौकात दाखल झाला. हा पुतळा विराजमान करण्याची कार्यवाही सोमवारी रात्र सुरू झाली. मंगळवारी पहाटे हा पुतळा चौथऱ्यावर विराजमान झाला.

फेब्रुवारीत अनावरण…

शिवरायांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात विराजमान करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ३१ फूट उंच चौथऱ्यावर ३ फुटांचे फाउंडेशन करुन त्यावर हा पुतळा बसविला गेला. पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची ५५ फूट इतकी होईल. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, मात्र, त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

पुतळ्याची वैशिष्ट्ये…

  • नवीन चौथऱ्याची उंची ३१ फूट
  • पुतळ्याची उंची २१ फूट
  • चौथऱ्याचा खर्च २.५ कोटी
  • नवीन पुतळ्याचा खर्च १ कोटी
  • पुतळ्याचे वजन १० टन

Back to top button