नंदुरबार : कथित ऑडिओ क्लिपद्वारे भांडा फोेड ; पुरवठा निरीक्षकावर झाली निलंबनाची कारवाई | पुढारी

नंदुरबार : कथित ऑडिओ क्लिपद्वारे भांडा फोेड ; पुरवठा निरीक्षकावर झाली निलंबनाची कारवाई

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : बायोडिझेल माफियाला कारवाईतल्या पळवाटा सांगून पाठीशी घालत आपली तुंबडी भरण्याचे काम केल्याचे कथित ऑडिओ क्लिपद्वारे उघड झाल्याप्रकरणी अखेरीस संबंधित पुरवठा निरीक्षकाला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने निलंबित केले आहे.

या प्रकरणाची कोणतीही चौकशी होत नाही म्हणून प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी दिला होता. तथापि तडकाफडकी ही कारवाई करीत पाटील यांना ऊपोषणापासून रोखण्यात आले आहे. बायोडिझेल माफियांच्या पाठीराख्या बड्या अधिकाऱ्यांवर प्रशासन प्रहार केव्हा करणार? हा प्रश्न आता केला जात आहे.

बनावट बायोडिझेलची अवैध विक्री करून शासनाचा कर बुडवणाऱ्या बायोडिझेल माफियांना महसूल व पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारीच कारवाईतल्या पळवाटा सांगतात, अशी तक्रार प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष बिपीन पाटील यांनी जानेवारीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी तसेच पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली होती. सॅम्पल मॅनेज करण्यासारखे मार्ग दाखवून स्वतःचे खिसे भरत आहेत व यंत्रणेतील जबाबदार अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे; असा आरोप करीत प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बिपीन पाटील यांनी दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी एक कथित ऑडिओ क्लिपही पत्रकार परिषदेत सादर केली होती.

एक बायोडिझेल माफिया आणि पुरवठा विभागातील एक कर्मचारी यांच्यातील याच मुद्यावरील संवाद असलेली ती कथित ऑडिओ क्लिप जिल्हाधिकारी यांना देऊन चौकशीची मागणी केली होती. संबंधित अवैधधंदेवाल्यांकडून लाखोच्या स्वरुपात आर्थिक व्यवहार करुन माल सोडून देण्यात आला असून हा व्यवहार कसा झाला याच्या पुराव्या दाखल ही ऑडीओ क्लिप (ध्वनीफित) आपणास मी सादर करीत आहे. तरी शासनाचा महसुल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्यावर चौकशी समिती नेमूण किंवा एसीबीद्वारे त्वरीत चौकशी करावी, असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित पुरवठा निरीक्षकावर झालेली निलंबनाची कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button