मोठी बातमी : इस्रायलने दक्षिण गाझामधून सैन्य घेतले मागे,जाणून घ्‍या कारण | पुढारी

मोठी बातमी : इस्रायलने दक्षिण गाझामधून सैन्य घेतले मागे,जाणून घ्‍या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दक्षिण गाझा पट्टीतून आपले सैन्‍य मागे घेतले आहे, असे इस्रायलच्या सैन्याने म्‍हटले आहे. रविवार ७ एप्रिल रोजी इस्रायलच्या सैन्याच्‍या 98 व्या कमांडो डिव्हिजनने खान युनिसमध्ये आपले मिशन पूर्ण केले आहे. या डिव्हिजनने गाझा पट्टी सोडली आहे. मात्र भविष्यातील ऑपरेशन्सची तयारी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्‍याचे इस्रायलच्या सैन्याने आपल्‍या निवदेनात स्‍पष्‍ट केले आहे. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या या युद्धाला 6 महिने पूर्ण होत असताना ही घटना घडली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने लष्कराच्या माघारीला दुजोरा दिला आहे, मात्र येथे इस्रायलच्या सैन्याची एक तुकडी बाकी असल्याचे म्‍हटले आहे. ( Israel withdrawn troops from south Gaza )

हमासच्‍या दहशतवाद्‍यांनी ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्‍ला केला. २५० हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवत सुमारे 1,200 इस्रायली नागरिकांची हत्‍या केली. त्यानंतर इस्रायलनने दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 13,800 मुलांसह 33,100 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार, सुमारे 1.7 दशलक्ष लोकांना त्यांची घरे आणि आश्रयस्थान सोडावे लागले आहे.

इस्रायल पुन्‍हा हल्‍ला करणार?

दक्षिण गाझामधून इस्रायली सैन्याची माघारीला अनेक संरक्षण तज्ज्ञ इस्रायलचे ‘रेस्ट आणि रिफिट’ ( R and R) धोरण मानत आहेत. गाझा पट्टीतील युद्ध पुढच्या टप्प्यात जाणार आहे. इस्रायलची कारवाई आणखी धोकादायक होणार आहे, असेही अनेक संरक्षण तज्ज्ञ मानत आहेत. १० लाखांहून अधिक निर्वासित राहत असलेल्या राफाहमध्ये इस्रायल आता ग्राउंड ऑपरेशन सुरू करणार आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सैन्‍य माघार घेताच हमासने इस्रायली सैनिकांवर डागले रॉकेट

दक्षिण गाझामधून सैन्य मागे घेतल्यानंतर काही वेळातच ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने वृत्त दिले की, गाझा सीमेजवळील खान युनिस येथून इस्रायली सैनिकांवर पाच रॉकेट डागण्यात आले. काही रॉकेट आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीमने मध्य हवेत डागण्यात आले, त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.

Back to top button