नेपाळच्या पंतप्रधानपदी अखेर शेर बहादूर देऊबा | पुढारी

नेपाळच्या पंतप्रधानपदी अखेर शेर बहादूर देऊबा

काठमांडू ; वृत्तसंस्था : नेपाळमध्ये महिनोन्महिने सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी अखेर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मंगळवारी ऐनवेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला होता.

अखेर नियुक्तिपत्रात दुरुस्ती करण्यात आली आणि त्यांचा शपथविधी झाला. येत्या दोन दिवसांत नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. भंग करण्यात आलेल्या संसदेची पुनर्स्थापना करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी देऊबा यांचा शपथविधी नियोजित होता.

नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या शिफारसीवरून 22 मे रोजी संसद भंग केली होती. 12 आणि 19 नोव्हेंबर रोजी निवडणुका घेण्यात येतील, असेही भंडारी यांनी जाहीर केले होते. भंडारी यांच्या निर्णयाविरुद्ध 30 हून अधिक याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या. विरोधी पक्षांकडून दाखल अशाच एका याचिकेत संसदेची पुनर्स्थापना करण्याची व काँग्रेस अध्यक्ष देऊबा यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली होती. ती ग्राह्य धरण्यात आली.

सरन्यायाधीश चोलेंद्र समशेर राणा यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींच्या पीठाने हा निर्णय देऊन आठवडाभरापासून सुरू असलेल्या सुनावणीला पूर्णविराम दिला.

नाट्यमय घडामोडी

नेपाळमध्ये डिसेंबर 20 पासून राजकीय संकट कायम होते. नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत कलहामुळे सरकार चालविणे कठीण झाले होते.

अखेर पंतप्रधान ओली यांच्या सल्ल्याने राष्ट्राध्यक्षांनी 20 डिसेंबर रोजी संसद भंग करून 30 एप्रिल आणि 10 मे रोजी निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने मात्र होती ती संसद कायम ठेवण्याचा निर्णय दिला आणि देऊबांची नियुक्तीही जाहीर केली.

भारत समर्थक देऊबा

चार वेळा नेपाळमध्ये पंतप्रधानपद भुषविलेले देऊबा हे भारत समर्थक मानले जातात. 2017 मध्ये पदावर येताच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला दिल्लीत आले होते.

Back to top button