भारत २०२७ मध्ये असणार जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था; जेम्स सुलिव्हन यांचा अंदाज | पुढारी

भारत २०२७ मध्ये असणार जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था; जेम्स सुलिव्हन यांचा अंदाज

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था :  भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, तसेच 2030 पर्यंत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये (जीडीपी) दुप्पट वाढ होऊन ते 7 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज जे. पी. मॉर्गनच्या एशिया- पॅसिफिक इक्विटी रिसर्चचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स सुलिव्हन यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ) ‘एक्स’वर पोस्ट करून याची दखल घेतली आहे.

सुलिव्हन यांनी सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असल्याचे आम्हाला जाणवू लागले आहे. 2030 पर्यंत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन दुप्पट होण्याची अपेक्षा असून, ते 7 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल. दीर्घकालीन विचार केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण संरचनेत मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येणार्‍या काळात भारतीय बाजारपेठ मजबूत होईल.

भारताची निर्यात होणार दुप्पट

येत्या सात वर्षांमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये 17 टक्क्यांवरून सुमारे 25 टक्क्यांपर्यंत वाढ होताना दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, आगामी काळात भारताची निर्यात दुप्पट म्हणजे एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button