पाकिस्तानच्या अण्वस्त्र केंद्राजवळ भीषण स्फोट | पुढारी

पाकिस्तानच्या अण्वस्त्र केंद्राजवळ भीषण स्फोट

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या अण्वस्त्र केंद्राजवळ शुक्रवारी महाभयंकर स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, 30 किमीपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला.

विविध पाकिस्तानी माध्यमांत अत्यंत त्रोटक माहिती उपलब्ध होत असून स्फोटानंतरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात डेरा गाझी खान येथे पाकिस्तानी लष्कराचा अण्वस्त्रांचा साठा असलेले केंद्र आहे. याला अणुआयोगाचा परिसर म्हणून ओळखले जाते. त्याच डेरा गाझी खान येथे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. हा स्फोट अण्वस्त्र साठा असलेल्या केंद्रात झाला की बाहेर याबाबतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा स्फोट एवढा भयंकर होता की, त्याचा आवाज 30 किमीच्या परिघात ऐकू आला. व्हिडीओत स्फोटानंतरची पळापळ व वेगाने धावणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलाच्या गाड्या दिसतात. या स्फोटांत जीवितहानी झाली की नाही, याबाबतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Back to top button