‘चीनवरील अवलंबित्व संपवण्यासाठी अमेरिकेसमोर भारत हाच पर्याय’ | पुढारी

'चीनवरील अवलंबित्व संपवण्यासाठी अमेरिकेसमोर भारत हाच पर्याय'

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि अमेरिकेतील मैत्रीपूर्ण  संबंध अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व संपवू शकतात, असा दावा अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी केला आहे.

रामास्वामी सध्या निवडणूक प्रचारासाठी आयोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत.  माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विवेक रामास्वामी म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व संपुष्टात आणू शकतात. अमेरिका सध्या आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून आहे; पण भारतासोबतचे संबंध दृढ करून अमेरिका चीनवरील अवलंबित्वातून मुक्त होऊ शकते.

पंतप्रधान मोदी भारतासाठी योग्य नेते

अमेरिकेने अंदमान आणि निकोबारमध्येही भारतासोबत लष्करी संबंध मजबूत करावेत जेणेकरून गरज पडल्यास मलाक्का सामुद्रधुनीत चीनला रोखता येईल. मध्यपूर्वेतील देशांकडून तेल खरेदी करणाऱ्या चीनची जहाजे मलाक्का सामुद्रधुनीतूनच जातात. या क्षेत्रांमध्ये भारतासोबत सहकार्य वाढवणे अमेरिकेच्या हिताचे असेल, असे रामास्वामी म्हणाले.

यावेळी रामास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. ते म्हणाले की ‘मला वाटते की पीएम मोदी भारतासाठी योग्य नेते आहेत आणि मला त्यांच्यासोबत भारत-अमेरिका संबंध मजबूत करायचे आहेत.

राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील सर्वात तरुण उमेदवार

अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील विवेक रामास्वामी हे सर्वात तरुण उमेदवार आहेत. ३८ वर्षीय रामास्वामी हे अब्जाधीश उद्योजक आणि बायोटेक कंपनी रोइव्हंट सायन्सेसचे संस्थापक आहेत. २३ ऑगस्ट रोजी मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे झालेल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेनंतर रामास्वामी यांची लोकप्रियता वाढली. चर्चेदरम्यान ते रिपब्लिकन पक्षाच्या इतर उमेदवारांना भारी पडले. सध्या रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्यानंतर रामास्वामी हे दुसरे उमेदवार म्हणून पुढे आले आहेत.

 रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेच्या सहभागाला विरोध

विवेक रामास्वामी हे युक्रेन युद्धात अमेरिकेच्या सहभागाविरोधात आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणासमोरील सर्वात मोठे आव्हान हे आहे की, आम्ही आमची जमीन सुरक्षित करत नाही. आम्ही जी युद्धे लढत आहोत त्याचा अमेरिकेच्या हिताचे नाही. अमेरिका सातत्याने युक्रेन युद्धात गुंतून चूक करत आहे. आपण चीनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तोच सध्या अमेरिकेसाठी सर्वात मोठा धोका आहे, असेही रामास्वामी यांनी म्हटले आहे.

अमेरिका आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून

चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेतील बहुतेक आयात देखील चीनमधूनच होते. गेल्या वर्षी अमेरिका आणि चीनमधील व्यापार ६९० अब्ज डॉलर्स इतका होता. अमेरिकेने गेल्या वर्षी चीनमधून ५३६ अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली, जी एकूण आयातीच्या १७ टक्के आहे. अमेरिकेने चीनला १५४ अब्ज डॉलरची निर्यातही केली. अमेरिकन कंपन्याही चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button