पाकिस्तानी युसूफ हमजांना ब्रिटनमध्येही हवीय फाळणी! | पुढारी

पाकिस्तानी युसूफ हमजांना ब्रिटनमध्येही हवीय फाळणी!

लंडन; वृत्तसंस्था : मूळचे पाकिस्तानी युसूफ हमजा द्विराष्ट्रवादाचा जन्मदत्त सिद्धांत घेऊनच जणू येथे आले होते. हमजा यांनी युनायटेड किंगडमच्या फाळणीची मागणी लावून धरली असून, त्याविरोधात मूळ भारतीय तसेच युनायटेड किंगडममधील पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी शड्डू ठोकला आहे. कुठल्याही स्थितीत देशाची फाळणी होणार नाही. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर, असा स्पष्ट इशारा सुनाक यांनी दिला आहे.

मूळ पाकिस्तानी युसूफ हमजा हे स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर आहेत. युनायटेड किंगडमपासून विभक्त होणे, या मुद्दयावरच युसूफ हमजा निवडणूक जिंकले. फुटीरवादाला त्यांनी सतत खतपाणी घातले. पंतप्रधान सुना हे फाळणीच्या विरोधात होते आणि आहेतच; पण त्यांनी आता हमजा यांना उद्देशून थेट ठणकावले आहे. युनायटेड किंगडमचा भूगोल बदलण्याचा प्रयत्न कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ दिला जाणार नाही. हमजा यांना फर्स्ट मिनिस्टर होऊन आठवडाच उलटला आहे.. ब्रिटनचे किंग आणि पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्यासोबत हमजा यांची औपचारिक भेटही अद्याप झालेली नाही.

युसूफ हमजा स्वतंत्र स्कॉटलंडसाठीची मोहीम तीव्र करणार आहेत. बहुसंख्य ब्रिटिश जनता स्वतंत्र स्कॉटलंडच्या विरोधात आहे. फाळणी होऊ न देण्याची राष्ट्रवादी जबाबदारी सुनाक यांनी घेतली आहे. सुनाक यांनी हमजांना खडे बोल सुनावताच मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश जनमत सुनाक यांच्या बाजूने वळल्याचे सांगण्यात येते.

Back to top button