Pakistan Nuclear Bombs : पाकिस्तान अणुबॉम्ब विकायला काढणार? २१ दिवस पुरेल एवढाच पैसा | पुढारी

Pakistan Nuclear Bombs : पाकिस्तान अणुबॉम्ब विकायला काढणार? २१ दिवस पुरेल एवढाच पैसा

इस्लामाबाद/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आम्ही जगात शांतता नांदावी यासाठी एक देश म्हणून काम करणार आहोत, असे भारताच्या विभाजनानंतर पाकिस्तानच्या निर्मितीच्या पहिल्या दिवशी मोहम्मद अली जिना म्हणाले होते खरे, पण तसे काहीही घडले नाही. निर्मितीनंतर 76 वर्षांतच पाकिस्तान शेवटचे श्वास मोजतो आहे. परकीय चलन साठ्यात 3 अब्ज डॉलर म्हणजे 25 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. एवढ्या पैशांत 3 आठवड्यांच्या आयातीचा खर्च कसाबसा भागेल. कटोरा घेऊन दारी आलेले पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर चीनसह सौदी अरेबियानेही हात वर केले आहेत. आयएमएफकडूनही बेलआऊट पॅकेज मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अशात पाकिस्तान आपल्याकडील अण्वस्त्रे विकायला काढेल, अशी धास्ती पाकची एकूणच प्रकृती बघता आंतरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञांना भेडसावते आहे. (Pakistan Nuclear Bombs)

सगळेच देश प्रसंगी कर्जे घेतात, पण पाकिस्तानने कर्जे घेऊन युद्धे लढली, कर्जे घेऊन दहशतवाद पोसला, कर्जाच्या रकमेतून बराच माल हडप करून पाक लष्करातील अधिकारी गब्बर बनले. एकूण कर्जात एकट्या चीनचे कर्ज 30 टक्के आहे. आयएमएफच नाही म्हणते आहे म्हटल्यावर चीनसह सौदी अरेबिया सार्‍यांनीच पाकला आणखी मदतीच्या बाबतीत हात वर केले आहेत. (Pakistan Nuclear Bombs)

जगाला धोका काय?  (Pakistan Nuclear Bombs)

  • पाकिस्तानने अण्वस्त्रे विकायला काढल्यास संभाव्य ग्राहक मुस्लिम देशच असतील. अशा परिस्थितीत इस्रायलच्या अस्तित्वाला धोका शक्य
  • अराजकाच्या स्थितीत अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागल्यास भारत, अमेरिका तसेच युरोपिय देशांना धोका उद्भवू शकतो.

पाक डिफॉल्टर झाल्यास…

  • देशातील कंपन्या, सेवा सारेच दिवाळखोरी घोषित करतील.
  • अनेक क्षेत्रे बंद पडतील, अन्न-वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.
  • लोक बँकांतून बचत काढून घेतील. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल. गुन्हेगारी वाढेल.

वर्षे, कर्जे आणि युद्धे…

  • 1947 मध्ये फाळणीनंतर भारताने पाकला 20 कोटी रुपये दिले, मात्र पाकने लगेचच काश्मीरवरून भारताशी युद्ध पुकारले. या पैशांचे पाणी केले.
  • 1958 मध्ये आयएमएफकडून 25 दशलक्ष डॉलर घेतले. युद्धग्रस्त असल्याचे भासवून आणखी 37 दशलक्ष डॉलर कर्ज घेतले आणि 1965 मध्ये भारतावर हल्ला केला.
  • 1960 मध्ये आयएमएफने तिसर्‍यांदा पाकला 75 दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले. 1971 मध्ये पुन्हा भारत-पाक युद्ध झाले. बांगला मुक्ती संग्रामाविरुद्ध पाकने दर आठवड्याला 200 कोटी रुपये खर्च केले.
  • 1971 ते 80 कर्जउचल कार्यक्रम सुरूच राहिला. 72 मध्ये 84 दशलक्ष डॉलर, 73 मध्ये 75, 74 मध्ये पुन्हा 75, 77 मध्ये 80 दशलक्ष डॉलर, तर 1980 मध्ये तब्बल 349 दशलक्ष डॉलरचे कर्ज पाकने आयएमएफकडून घेतले.
  • 1999 मध्ये पुन्हा भारताविरुद्ध युद्ध. कारगिल युद्धात पाकचा दररोज 10 ते 15 कोटी रुपये खर्च म्हणून मग आयएमएफकडून सलग दोन वर्षे मोठाली कर्जे पाकला उपलब्ध झाली.
  • 2001 ते 1010 दरम्यान युद्धे, दहशतवादाने पोळलेला देश अशी स्वत:ची प्रतिमा उभी करून दहशतवादाविरोधात 67.93 अब्ज डॉलरचा खर्च केल्याचे पाकने भासविले. आयएमएफकडून बेलआऊट पॅकेज घेतले.
  • 2023 मध्ये आता 23 व्यांदा आयएमएफसमोर कटोरा घेऊन पाक उभा आहे.

कर्ज फुगले

  • 2017 : सर्वसाधारण सरकारी कर्ज जीडीपीच्या तुलनेत 60 टक्के होते.
  • 2022 : नवीन कर्जांमुळे पाच वर्षांत ते 78 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

रुपया घसरला

  • 2022 : मध्ये पाक रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 178 रुपये होती.
  • 2023 : सध्या एका डॉलरला ती 260 पाक रुपयांपर्यंत घसरलेली आहे.

आयात खर्च वाढला

  • 2020 : या वर्षात आयातीवर खर्च 3.6 लाख कोटी रुपये होता.
    2022 : रुपया घसरल्याने तो गतवर्षी 5.3 लाख कोटींवर गेला.

Back to top button