व्हिएतनामचे भारताशी ‘लव कनेक्शन’ | पुढारी

व्हिएतनामचे भारताशी ‘लव कनेक्शन’

दा नांग (व्हिएतनाम), वृत्तसंस्था : कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे चाललेल्या टाळेबंदीतून बाहेर पडलेले अनेक देश आता भारतीय प्रवाशांसाठी पायघड्या अंथरू लागले असतानाच व्हिएतनामसारखा अत्यंत निसर्गसंपन्न आणि समुद्रकिनार्‍यांनी नटलेला देश थेट दिल्ली-व्हिएतनाम, मुंबई-व्हिएतनाम उड्डाणऐ सुरू करत भारतीय पर्यटकांना आणि विशेषत: नवविवाहित जोडप्यांना मधूचंद्राचे निमंत्रण देतो आहे. व्हिएतनाममधील केवळ बुद्ध मंदिरेच नव्हे तर हिंदू देव-देवतांची प्राचीन मंदिरे भारतीयांचे विशेष आकर्षण ठरत असून, येथील समुद्रकिनारे तर त्यांना अक्षरश: भूरळ घालत आहेत.

पूर्वी व्हिएतनामचा पत्ताही भारतीय प्रवाशांच्या यादीत नव्हता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. व्हिएत जेट या व्हिएतनामच्या एअरलाईन्सने दा नांग आणि फू कोक या स्वर्गीय समुद्रकिनारे असलेल्या परिसरांत मधूचंद्र साजरा करता यावा म्हणून विशेष उड्डाणे केवळ भारतीय जोडप्यांसाठी सुरू केली आहेत. लव कनेक्शन असे नावच या मोहिमेला व्हिएत जेटने दिले आहे. दा नांगचा ईश्वरी हातांनी तोलून धरलेला पूल या जोडप्यांच्या बकेट लिस्टवर खासकरून दिसतो. मध्य व्हिएतनामचे बंदर असलेले दा नांग गाठण्यासाठी व्हिएतजेटने आता मुंबईहून थेट विमान सुरू केले आहे. याशिवाय आठवड्यातून चार वेळा अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरू येथूनही दा नांगसाठी विमाने उडतील. अधिकाधिक भारतीय प्रवासी व्हिएतनाममध्ये यावेत हा यामागचा विचार असल्याचे दा नांग पर्यटन विभागाचे संचालक त्रूओंग थी हाँग हनाह यांनी सांगितले.

व्हिएतनामची होचिमिन्हसारची शहरे पर्यटनाच्या नकाशावर आधीच ख्यातकीर्त आहेत. होचिमिन्ह, हनोई आणि फू कोक या शहरांसाठी भारतातून आठवड्याला तीन ते चार विमाने फक्त व्हिएतजेटचीच उडतात. याशिवाय भारत आणि व्हिएतनामला आणखी दोन एअरलाईन्सनेही आठवड्याची उड्डाणे घेत जोडून टाकले आहे.

आता दा नांग, होई आन, फू कोक आणि व्हुए यांसारख्या निसर्गसुंदर शहरांकडे जगाचे लक्ष वेधले जात आहे. निसर्ग आणि बौद्ध तथा हिंदू देव-देवतांची मंदिरे असे दुहेरी वरदान लाभलेल्या या शहरांकडे आता पर्यटकांचा मोर्चा वळतो आहे. पंधराव्या शतकापासून ते 19 व्या शतकापर्यंत दक्षिण आशियाच्या व्यापाराचे मोठे बंदर असलेले होई आन हे अत्यंत नीट जतन केलेले उदाहरण आहे. स्वदेशी आणि विदेशी परिणामांच्या ऐतिहासिक खुणा हे शहर वारसा म्हणून जपून आहे.

भारतीय पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊनच व्हिएतजेटने विशेष उड्डाणे सुरू केली आणि जोडीला व्हिएतनाम सरकारनेही व्हिसाची कटकट ठेवली नाही. खिशात पासपोर्ट टाका आणि थेट व्हिएतनाम गाठा. इथे पोहोचल्यानंतर ‘चाओ मुंग’ म्हणत व्हिएतनामचे इमिग्रेशन अधिकारी तुमच्या पासपोर्टवर व्हिसाचा शिक्का मारतात! त्यानंतर व्हिएतनाममध्ये प्रत्यक्षात दाखल झाल्यानंतर ‘जेवणाचे काय’, असा मोठा यक्षप्रश्न भारतीय प्रवाशांसमोर उभा ठाकायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने याचीही दखल घेत व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांसाठी अनेक सुविधा उभारणे सुरू केले असून, अनेक शहरांत भारतीय रेस्टॉरंट्स मोठ्या संख्येने सुरू करण्याचा उपक्रमच पर्यटन मंडळाने हाती घेतल्याचे व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाचे उपप्रमुख सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button