कोरोना महामारीवरील रामबाण उपाय द‍ृष्टिपथात | पुढारी

कोरोना महामारीवरील रामबाण उपाय द‍ृष्टिपथात

टोरँटो : वृत्तसंस्था दोन वर्षे जगाला छळणार्‍या कोरोना विषाणूच्या विनाशाबद्दल एक आनंदाची बातमी आहे. कोरोना कधी संपणार, या गहन प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळाले आहे. कोरोनाच्या सर्वच व्हेरियंटस्च्या जनुकीय संरचनेतील कच्चे दुवे शोधण्यात यश आले असून कोरोनाच्या समूळ उच्चाटनाचा रामबाण उपाय द‍ृष्टिपथात आला आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठांतर्गत झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांना हे यश आले आहे.

मूळ भारतीय असलेले शास्त्रज्ञ श्रीराम सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखालील चमूने कोरोनाच्या ओमायक्रॉनपासून ते सर्वच प्रकारच्या व्हेरियंटस्चे कच्चे दुवे शोधून काढले आहेत. विषाणूच्या रचनेतील कमकुवत ठिकाण शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. प्रतिपिंडांच्या मदतीने याच कमकुवत जागेला लक्ष्य केले जाईल आणि यातून उपचाराचा मार्ग सुकर होईल. सर्वच व्हेरियंटस्वर परिणामकारक ठरेल असा उपचार आता शोधून काढता येणार आहे. सर्व प्रकारच्या व्हेरियंटस्वर परिणामकारक ठरेल, अशी लस निर्मिती तसेच कोरोनावरील औषध बनविण्याच्या दिशेने कोरोनाची ही कमजोर नस मैलाचा दगड ठरणार आहे.

श्रीराम सुब्रमण्यम यांनी कानपूर आयआयटीतून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. अमेरिकेतील पिटस्बर्ग विद्यापीठातील औषध विभागात ते प्रोफेसर आहेत. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या पाक्षिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून विषाणूच्या ‘स्पाइक प्रोटीन’मधील कमकुवत जागा ‘क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’द्वारे (क्रायो-ईएम) हेरण्यात आली.

अल्फा, डेल्टा, बिटा, गॅमा अशा सर्वच कोरोना व्हेरियंटस्चे कुलूप उघडू शकेल, अशी मास्टर चावी आम्ही अखेर शोधून काढली आहे. विषाणूतील कमकुवत भागावर मारा करून विषाणूचा मानवी पेशींतील प्रवेश आता रोखला जाईल.
– प्रो. श्रीराम सुब्रमण्यम, पिटस्बर्ग विद्यापीठ, अमेरिका

हेही वाचा

Back to top button