सिव्हिल कोर्ट स्थानक होणार ‘प्रतिस्वारगेट’; तीन मेट्रो लाइन कनेक्टिंगमुळे बनणार सर्वांत मोठे स्थानक | पुढारी

सिव्हिल कोर्ट स्थानक होणार ‘प्रतिस्वारगेट’; तीन मेट्रो लाइन कनेक्टिंगमुळे बनणार सर्वांत मोठे स्थानक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बाजूलाच असलेली न्यायालयाची इमारत, मेट्रोच्या हिंजवडी, वनाज-रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या तीन मार्गांची येथे आलेली कनेक्टिव्हिटी, आगामी काळात बनणारे बस टर्मिनल, पिक अप अँड ड्रॉप, वाहन पार्किंग यामुळे भविष्यात मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट स्थानकात नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे हे स्थानक भविष्यात दुसर्‍या स्वारगेट स्थानकाप्रमाणेच भासणार आहे. महामेट्रो प्रशासनाने येथे असलेल्या तीन कामगार पुतळा, राजीव गांधी या वसाहती हटवून येथे मेट्रो स्थानक उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या स्थानकाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मेट्रो प्रशासनाने येथील स्थानकाची तीन फेजमध्ये विभागणी केली आहे. येथे दोन मेट्रो स्थानके असणार आहेत. यातील एक स्थानक भूमिगत असणार असून, या स्थानकात, पिंपरी ते स्वारगेटदरम्यान धावणार्‍या मेट्रो ट्रेन थांबा घेतील, तर दुसरे एलिव्हेटेड म्हणजेच हवेतील स्थानक असणार आहे. या स्थानकात वनाज ते रामवाडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान धावणार्‍या मेट्रो ट्रेन थांबा घेतील. त्यामुळे येथे आगामी काळात मोठी वर्दळ असणार आहे. या स्थानकाला चार ठिकाणी मेट्रोकडून प्रवेशद्वार देण्यात येणार आहेत. त्याचा वापर नागरिकांना ये-जा करण्यासाठी करता येणार आहे.

मेट्रोच्या तीन लाइन कनेक्टिव्हीटीमुळे आगामी काळात सिव्हिल कोर्ट स्थानक सर्वाधिक गजबजणारा भाग असेल. तीन मेट्रो मार्गांचा हा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे हे स्थानक मल्टिमोडल इंट्रिग्रेशन करण्यात येणार आहे. सध्या त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, संपुर्ण परिसर ग्रीन असावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

                                       – हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

स्थानकाची वैशिष्ट्ये
सिव्हिल कोर्ट स्थानक
मल्टिमोडल इंटिग्रेशन
स्थानकाची तीन फेजमध्ये विभागणी
स्थानकाला चार प्रवेशद्वार
स्थानकाची संकल्पित चित्रे तयार

अशा असतील अंतर्गत सुविधा
स्टेशनची सुसज्ज इमारत
चारचाकी-दुचाकी पार्किंग
पाण्याची सुविधा असलेला प्लाझा
परिसरात पादचारी मार्ग
भिंतीवरील बाग (व्हर्टिकल गार्डन)
अंतर्गत बगीचा
साइट डेव्हलपमेंट एरिया गार्डन
मोकळ्या जागेत विविध
प्रकारची झाडेे लावणार
नदीच्या बाजूला वृक्षारोपण
मुख्य रस्ता
अंतर्गत छोटे रस्ते
पीएमपी बस टर्मिनल
ऑटो रिक्षा, टॅक्सी फीडर सर्व्हिस
स्कायवॉकसह सोयीस्कर लिफ्ट, जिने
सरकते जिने
रस्ता क्रॉसिंगसाठी न्यायालयातून
भुयारी प्रवेशद्वार

 

Back to top button