पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा राज्यातील 186 पंचायतीचे सरपंच व उपसरपंच निवडीसाठी सोमवार 22 ऑगस्ट रोजी सर्व पंचायत कार्यालयात बैठकांचे आयोजन केले आहे. बहुतांश जागी सरपंच व उपसरपंच कोण होणार हे जवळ जवळ नक्की झालेले असले तरी अनेक पंचायतीत सरपंच व उपसरपंच यांच्या नावावर मतैक्य न झाल्याने निवडणूक अटळ ठरली आहे.
राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे या पक्षाकडे बहुतांश पंचायती आलेल्या आहेत. भाजपचे मंत्री व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील पंचायती आपल्याकडे राहाव्यात यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले असले तरी बहुमत न मिळालेल्या काही पंचायतीत आपल्या समर्थकाकडे याव्यात यासाठी मंत्री व आमदारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या एकूणच घडामोडीत अपक्ष निवडून आलेल्या पंच सदस्यांची चांदी झाली असून त्याना सरपंचपदासोबत बरेच काही मिळणार आहे.
राज्यातील 186 पंचायतीसाठी दि.10 ऑगस्ट रोजी झालेल्या मतदानात 78.70 टक्के मतदान झाले. 64 उमेेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळच्या निवडणुकीत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. 12 ऑगश्ट रोजी मतमोजणी झाली होती. या पंचायत निवडणुकीत 7,97,020 मतदारापैकी 6,26,476 मतदारांनी मतदान केले होते.
तिसवाडी तालुक्यातील सांत आंद्रे मतदारसंघात येणार्या आजोशी मंडूर या 7 सदस्यीय पंचायतीत माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा समर्थक भाजपचे तीन तर विद्यमान आमदार विरेश बोरकर समर्थक आरजीपीचे तीन पंच निवडून आले आहेत. तर प्रशांत नाईक हे अपक्ष निवडून आले आहेत. सिल्वेरा यांनी प्रशांत नाईक यांना आपण निवडून आणल्याचा दावा करून तो आपल्यासोबत येणार व आजोशी मंडुर पंचायतही आपल्याच ताब्यात येणार असा दावा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे बोरकर हे आमदार असतानाही सांत आंद्रेतील बहुतांश पंचायतीवर सिल्वेरा यांच्या समर्थकांनी विजय संपादन केला आहे. तर पंचायतीवर बहुमत प्राप्त करण्यास अपयशी ठरलेले आमदार बोरकर यांनी प्रशांत नाईक आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रशांत नाईक काय निर्णय घेतात ते पहावे लागेल.