कॅन्सरवर सापडले रामबाण औषध? | पुढारी

कॅन्सरवर सापडले रामबाण औषध?

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : गुदाशयाचा कर्करोग असलेल्या अमेरिकेमधील काही रुग्णांवर नुकताच एक चमत्कार वाटावा असा प्रयोग करण्यात आला. तो यशस्वीही झाला. त्यामुळे या विषयातील तज्ज्ञसुद्धा थक्‍क झाले आहेत. या प्रयोगामुळे त्यांचा कर्करोग प्रायोगिक उपचारांनी चक्‍क नाहीसा झाला आहे!

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका अत्यंत लहान क्लिनिकल चाचणीत 18 रुग्णांनी डॉस्टारलिमॅब नावाचे औषध सुमारे सहा महिने सातत्याने घेतले. याचा परिणाम असा झाला की, या सहा महिन्यांनंतर त्या सर्वांच्या शरीरामधील कॅन्सरचा ट्यूमर गायब झाल्याचे आढळले. या संशोधनासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर हे औषध खरोखरच कॅन्सरवरील रामबाण उपाय ठरू शकते काय, याबाबत वैद्यकीय क्षेत्रामध्ये गंभीरपणे चर्चा सुरू झाली आहे. अर्थात त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या, संशोधन आणि अभ्यास आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

डॉस्टारलिमॅब औषधाची करामत

डॉस्टारलिमॅब हे औषध प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या रेणूंपासून बनवण्यात आले आहे. हे औषध मानवी शरीरात पर्यायी प्रतिपिंडांप्रमाणे काम करते. संबंधित प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या सर्व 18 रुग्णांना गुदाशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. या सर्व रुग्णांना समान प्रमाणामध्ये हे औषध देण्यात आले. उपचारांचा परिणाम असा झाला की, या सर्वच्या सर्व 18 रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नष्ट झाला. शारीरिक तपासणीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये सध्या कॅन्सरचा कुठलाही ट्युमर सापडलेला नाही. एंडोस्कोपी; पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी किंवा पीईटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनच्या माध्यमातून चाचण्या करण्यात आल्यानंतरही त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरचा ट्युमर आढळून आला नाही हे विशेष.

न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए. डायझ जे. यांनी, असा प्रकार कर्करोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असल्याचे सांगितले.

क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या रुग्णांवर ही चाचणी सुरू होण्याआधी केलेल्या कॅन्सरच्या उपचारांदरम्यान केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रियांसारखे उपचार करून पाहिले होते. मात्र या चाचणीमध्ये सहभागी झाल्यानंतर उपचार पुढील टप्प्यामध्ये जात असताना रुग्णांना आतडे, मूत्रपिंड आणि लैंगिकतेसंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला होता. मात्र हा धोका पत्करून हे 18 रुग्ण या चाचणीला सामोरे गेले. आश्‍चर्य म्हणजे पहिल्याच टप्प्यातच हे रुग्ण कर्करोगमुक्‍त झाले. त्यांना पुढील उपचारांची गरजच भासली नाही.

Back to top button