आफ्रिकी देशांशी संबंध मजबूत करणार : मोदी | पुढारी

आफ्रिकी देशांशी संबंध मजबूत करणार : मोदी

जोहान्सबर्ग : श्रीराम जोशी

आफ्रिकन देशांसोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर विविध आफ्रिकन देशांच्या नेत्यांसमवेत झालेल्या भेटीवेळी व्यक्‍त केला. परिषदेच्या निमित्ताने आलेले चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचीही त्यांनी भेट घेतली. गेल्या तीन महिन्यांत तिसर्‍यांदा मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली आहे. मोदी यांनी आज अर्जेंटिना व अंगोला या देशांच्या अध्यक्षांचीही भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. 

कृषी, व्यापार आणि गुंतवणूक, खाद्यान्न प्रक्रिया, औषध, तेल व नैसर्गिक वायू, ऊर्जा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्याच्या द‍ृष्टीने मोदी यांनी अंगोलाचे अध्यक्ष जोयाओ लौरिन्को यांच्याशी विचारविनिमय केला. भारताचे अंगोलासोबत मित्रत्वाचे संबंध आहेत. तेल व नैसर्गिक उत्खननात अंगोला आघाडीवर आहे. भारताची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अंगोला चांगला भागीदार बनू शकतो, असा विश्‍वास मोदी यांनी यावेळी व्यक्‍त केला. 1975 पर्यंत अंगोलावर पोर्तुगीजांचे राज्य होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही वर्षातच अंगोलाने ऊर्जा क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. अंगोलाच्या व्यापार भागीदारांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा भागीदार देश आहे. कच्च्या तेलाच्या आयातीच्या बाबतीत भारत अंगोलावर मोठ्या प्रमाणावर विसंबून आहे. आफ्रिका खंडातून काही मोजके देश भारताला कच्च्या तेलाची निर्यात करतात. यात नायजेरिया व अंगोला यांचा वाटा सर्वाधिक आहे. 

अर्जेंटिनाचे अध्यक्ष मौरिशियो मॅक्री यांचीही मोदी यांनी भेट घेतली. ‘जी 20’ देशांच्या परिषदेवेळी मॅक्री यांना ब्रिक्स देशांच्या परिषदेस हजर राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार मॅक्री हे जोहान्सबर्गला आले आहेत. कृषी, औषध व गुंतवणूक क्षेत्रात भारत-अर्जेंटिना यांच्यादरम्यान व्यापार वृद्धी करण्यास मोठा वाव आहे. अणू पुरवठादार समूह अर्थात एनएसजीमध्ये भारताचा समावेश व्हावा, यासाठी अर्जेंटिनाने भारताला पाठिंबा दिला आहे. याबद्दल मोदी यांनी मॅक्री यांचे आभार मानले. गेल्या काही वर्षांत चीनने आफ्रिकन खंडात प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. भारत आणि चीन यांच्या व्यापार भागीदारीत गेल्या काही काळात वेगाने वाढ झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर मोदी-जिनपिंग यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. द्विपक्षीय संबंधाचा सतत आढावा घेणे आणि ते मजबूत होण्यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी जिनपिंग यांना या भेटीदरम्यान सांगितल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. संपर्क यंत्रणा मजबूत करणे, सहकार्याच्या भूमिकेतून काम करण्याची गरज असल्याचे मत चीनकडून व्यक्‍त करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी परिषदस्थळी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेत विविध विषयांवर चर्चा केल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

Back to top button