पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलच्या दक्षिणेकडील राज्य रिओ ग्रँडो डो सुलमध्ये पुरामुळे मृतांची संख्या ७५ वर पोहोचली असून असून १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. १,१५००० हजारांहून अधिक लोक घरातून विस्थापित झाले आहेत. तर सुमारे १६ हजार लोकांनी शाळा, जिम आणि इतर तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आश्रय घेतला.
उरुग्वे आणि अर्जेंटिनाच्या सीमेवर असलेल्या राज्यातील सुमारे ५०० शहरांपैकी अनेक शहरांवर गेल्या काही दिवसांतील वादळांमुळे आलेल्या पुराचा परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १ लाख १५ हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. पुरामुळे अनेक शहरांतील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. पावसामुळे भूस्खलनही झाले आहे.
राज्याचे गव्हर्नर एडुआर्डो लेइट यांनी सांगितले की, आम्ही ज्या आपत्तीचा सामना करत आहोत ते अभूतपूर्व आहे. राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी रविवारी दुसऱ्यांदा पूर प्रभावित राज्याला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री जोस मुसिओ, अर्थमंत्री फर्नांडो हद्दाद आणि पर्यावरण मंत्री मरिना सिल्वा हे देखील उपस्थित होते.