इंडोनेशियातील लोम्बोक बेटावर भूकंप; दहा ठार | पुढारी

इंडोनेशियातील लोम्बोक बेटावर भूकंप; दहा ठार

जकार्ता (इंडोनेशिया) : पुढारी ऑनलाईन

इंडोनेशियातील लोम्बोक बेटाला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ एवढी नोंद झाली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून ४० लोक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

या शक्तिशाली भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत, अशी माहिती आपत्ती निवारण एजन्सीने दिली आहे. लोम्बोक बेट हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे येथे नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. आज पहाटे जेव्हा भूकंपाचा हादरा बसला; तेव्हा लोक झोपेत होते. ज्यांना भूकंपाची जाणीव झाली ते सुरक्षेसाठी घरातून बाहेर पडून मोकळ्या जागेत धावले. २० ते ३० सेकंदात ४३ भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के बाली बेटालाही बसले, अशी माहिती आपत्ती निवारण एजन्सीने दिली आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू लोम्बोक बेटापासून ईशान्येला असलेल्या मातारम शहरापासून ५० किलोमीटरवर होता, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिली आहे. 

 

Back to top button