पाक लष्कराला बूट पॉलिश करणारा मिळाला; रेहम खान खोचक प्रतिक्रिया | पुढारी

पाक लष्कराला बूट पॉलिश करणारा मिळाला; रेहम खान खोचक प्रतिक्रिया

इस्लामाबाद :

पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणार्‍याची गरज होतीच; तो त्यांना मिळाला, अशी आक्षेपार्ह प्रतिक्रिया इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनी दिली आहे. रेहम खान यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी वारंवार इम्रान खान यांना बदनाम करणार्‍या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रेहम खान यांनी आपल्या पुस्तकातून इम्रान खान यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर आणि ते पंतप्रधानपदाच्या खुर्चीजवळ पोहोचलेल असतानाही त्यांनी अशाच प्रकारची खोचक प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, इम्रान केवळ अ‍ॅक्टर आहे. तेथील लष्कर डायरेक्टर आहे. निकाल मतदानापूर्वीच ठरला होता. पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीने इम्रान खान यांनी हा विजय मिळविला आहे. या लष्कराला बूट पॉलिश करणार्‍याची गरजच होती आणि  त्यांना या कामासाठी अगदी योग्य व्यक्‍ती मिळाली आहे. पंतप्रधानपद मिळणार म्हणून इम्रान खान सुखावले असले, तरी त्यांच्यावरील लष्कराची ही कृपा थोड्याच दिवसांसाठी असेल, असा दावा त्यांनी केला.

इम्रान खान यांना पाच अनौरस मुले आहेत. त्यातील काही भारतात आहेत, असाही दावा रेहम यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. रेहम खान यांनी इम्रान खान यांचे अनैतिक संबंध आणि खासगी आयुष्यातील अन्य काही गोष्टी त्यांच्या पुस्तकातून उघड केल्या आहेत.

Back to top button