अमेरिकेतील ‘या’ व्हिसाधारक भारतीयांना बसणार दणका; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय   | पुढारी

अमेरिकेतील 'या' व्हिसाधारक भारतीयांना बसणार दणका; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय  

वॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेत एच-४ व्हिसाधारकांना देण्यात आलेला नोकरीचा परवाना पुढील तीन महिन्यांत मागे घेण्यात येईल, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आज (शनिवार) फेडेरल न्यायालयात सांगितले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो भारतीयांना फटका बसण्याची शक्यता आहे. एच-१ व्हिसाधारकांच्या पती/पत्नीला नोकरी करण्यासाठी एच-४ व्हिसा दिला जातो. असा व्हिसा घेणाऱ्यामध्ये भारतीयांची संख्या सर्वांधिक आहे.

एच-१ व्हिसाधारकांच्या पती/पत्नीला नोकरी करण्याचा परवाना देण्याचा निर्णय अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात घेतला होता. मात्र, हा निर्णय ट्रम्प प्रशासन रद्द करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाचा अमेरिकेत एच-४ व्हिसा असलेल्या ७० हजार लोकांना बसणार आहे. यात भारतीयांची संख्या सर्वांधिक आहे.

होमलँड सुरक्षा विभागाने (डीएचएस) कोलंबिया येथील जिल्हा न्यायालयात नुकत्याच दाखल केलेल्या अहवालात म्हटले होते की, एच-४ व्हिसा देण्याबाबतचे जुने नियम रद्द करण्याबाबत पावले उचलली जात आहेत. याबाबत नवीन नियम व्हाईट हाऊसमधील अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कार्यालयाकडे (ओएमबी) तीन महिन्यांच्या आत सादर केले जातील. 

दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या धोरणामुळे अमेरिकेतील नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याचा दावा ‘सेव्ह जॉब्स अमेरिका’ या संघटनेने केला आहे. अमेरिकेत काम करणाऱ्या नोकरदारांच्या हितासाठी ही संघटना काम करत आहे. या संघटनेने खटला दाखल केला आहे. त्यामुळे प्रशासनाने एच-४ व्हिसा संदर्भात निर्णय स्थगित ठेवला आहे, असेही डीएचएस न्यायालयात सांगितले आहे.

एच-४ व्हिसाबाबत होमलँड सुरक्षा विभागाने २८ फेब्रुवारी, २२ मे आणि ऑगस्ट २० असा तीनवेळा सद्य:स्थितीचा अहवाल सादर केला आहे. आता पुढील अहवाल १९ नोव्हेंबर रोजी सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Back to top button