शाहरूखला भेटण्‍यासाठी आलेला ‘तो’ २२ महिन्‍यांनी पाकिस्‍तानात परतला  | पुढारी

शाहरूखला भेटण्‍यासाठी आलेला 'तो' २२ महिन्‍यांनी पाकिस्‍तानात परतला 

पेशावर : वृत्तसंस्‍था 

बॉलिवूडचा ‘बादशहा’ शाहरुख खानचे फॅन्‍स जगभरात आहेत. काही फॅन्‍स शाहरुखला अक्षरश: डोक्‍यावर घेतात. कधी त्‍याच्‍यासाठी जीव धोक्‍यात घालून मोठ्‍या फ्‍लेक्‍सवर चढतात तर कधी स्‍टंटबाजी करून शाहरुखचे आपण डायहार्ट फॅन असल्‍याचे सांगतात. शाहरुखला भेटण्‍यासाठी अशाच एका फॅनने सर्व मर्यादा ओलांडल्‍या आणि सीमा पार करून भारतात आला.

शाहरुखचा पाकिस्‍तानमधील एक फॅन शाहरुख आणि काजोलला भेटण्‍यासाठी पाकिस्‍तानातून भारतात आला. मात्र, त्याला तुरुंगात जावे लागले. त्‍याची २२ महिन्‍यांच्‍या तुरुंगवासानंतर सुटका झाली. त्‍यानंतर तो आपल्‍या घरी (पाकिस्‍तान) परतला आहे. 

अब्‍दुल्‍लाह असे त्‍या फॅनचे नाव असून तो पाकिस्‍तानातील खैबर पख्‍तुनवा प्रांतातील स्‍वात जिल्ह्यातील राहणारा आहे. 

अब्दुल्लाह शाहला अटारी वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी रेंजर्स यांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले. अब्दुल्लाह ऑटिझमग्रस्त आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि काजोलला भेटण्‍याची इच्‍छा ठेवून तो २०१७ मध्‍ये कुठलीही कागदपत्रे न घेता भारतात आला होता. 

अब्दुल्लाह आपल्‍या कुटुंबीयासोबत वाघा बॉर्डरवर एका समारंभात आला होता. नंतर तो सीमा पार करून भारतात आला. त्‍याचे शाहरूखला भेटण्‍याचे स्‍वप्‍न अपूर्णच राहिले. मात्र, भारतात त्‍याला अटक करण्‍यात आले. जवळपास त्‍याला २२ महिने तुरुंगात राहावे लागले. 

अब्‍दुल्‍लाहने म्‍हटले आहे, ‘मी व्‍हिसा घेऊन भारतात परत येईन आणि शाहरूखला भेटेन. पुन्‍हा बेकायदेशीर मार्गाने भारतात येणार नाही.’

Back to top button