जेरूसलेम वाद : इस्त्राईल अन् पॅलेस्टाईनमध्ये दहशत'वाद' पेटण्यामागे नेमकं कारण काय?  | पुढारी

जेरूसलेम वाद : इस्त्राईल अन् पॅलेस्टाईनमध्ये दहशत'वाद' पेटण्यामागे नेमकं कारण काय? 

अर्जुन नलवडे; पुढारी ऑनलाईन : समाजातील बहुतेक कट्टरतावादाचा केंद्रबिंदू ‘धर्म’च असतो. त्याच्याभोवती वाद, प्रतिवाद, हिंसा, कुरघोड्या आणि दहशत या गोष्टी फिरत असतात. सध्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जेरुसलेमधील अल-अस्का मशिदीमध्ये हा संघर्ष सुरू झाला. दगडफेक आणि फटाके फोडण्यात आले. (जेरूसलेम वाद)
या संघर्षात इस्त्राईल पोलिसांना अश्रूधुरांचा आणि रबरी गोळ्यांचा वापर करावा लागला. शुक्रवारी झालेल्या संघर्षात ४२ जण जखमी झाले आहेत, तर २२ जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर मुद्दा असा आहे की, जेरुसलेम शहरावरून पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल या देशांमधील वाद का आहे? तो वाद इतका टोकाला का जातो ? हा जुना वाद चिघळतच राहणार आहे का? याची उत्तरं इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला सापडतात. चला तर पाहू ‘जेरूसलेमच्या वादा’विषयी!
जेरूसलेम शहराचा इतिहास 
जेरूसलेम हे एकच शहर ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लीम लोकांसाठी अत्यंत महत्वाचं असून ते अत्यंत पवित्र मानलं जातं. हिब्रू भाषेत ‘येरुशलायिम’ आणि अरेबिकमध्ये ‘अल्-कुड्स’ या नावांनी जेरुसलेमला ओळखलं जातं. जगाच्या इतिहासात सर्वांत जुनं शहर म्हणून या शहराची गणना होते. वास्तविक पाहता अनेक जणांनी जेरुसलेम जिंकलं आहे, हल्ला केला आहे आणि पुन्हा उभारलं देखील आहे. (जेरूसलेम वाद)
आता तीन धर्म या शहरावर दावा सांगतात. त्यांच्यात वाद होतात आणि हे शहर चर्चेत राहतं. ‘ओल्ड सिटी’ हा भाग जेरुसलेम शहराचा मुख्य गाभा आहे. या ठिकाणी ख्रिस्ती, ज्यू, मुस्लीम आणि आर्मेनियन, याच भागांचं प्रतिनिधीत्व दाखविणाऱ्या ऐतिहासिक इमारती आहेत. आणि या इमारतींभोवती दगडी भिंती आहेत. जगातल्या पवित्र स्थळांचा समावेश इथंच होतो. आर्मेनियन आणि ख्रिश्चन एकच असल्याने आर्मेनियनचा भाग सेंट जेम्स चर्च आणि मोनेस्ट्रीने व्यापला आहे. त्या ठिकाणीतील महत्वाची धार्मिक स्थळे आपण पाहू…
चर्च ः ‘दी चर्च ऑफ दी होली सेपल्कर’ हे चर्च असून येशूची कथा, त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म, या सगळ्या कथा जिथं घडल्या त्या ठिकाणावर हे चर्च उभं राहिलं आहे. ग्रीक आर्थोडाॅक्स पॅट्रिआर्केट, फ्रान्सिस्कन फ्रायर्स, आर्मेनियन पॅट्रिआर्केट, इथिओपियन्स, काॅप्टिक्स आणि सीरियन ऑर्थोडाॅक्स यांचा समावेश या चर्चमध्ये होतं. जगभरातील लाखो ख्रिश्चिन या चर्चला भेट देतात.
मशीद ः जेरुसलेमच्या ४ महत्वाच्या भागांपैकी सर्वात मोठा भाग आहे तो मुस्लिमांचा. ‘डोम ऑफ राॅक’ आणि ‘अल अक्सा मशीद’ ही महत्वाची ठिकाणं तिथं आहेत. इस्लाममधील तिसऱ्या क्रमांकाचं पवित्र स्थळ म्हणून या मशिदीकडे पाहिलं जातं. असं सांगितलं जातं की, प्रेषित मोहम्मद मक्केतून येथे आले. प्रार्थना केली आणि डोम ऑफ दी राॅकजवळ असणाऱ्या फाऊंडेशन स्टोनवरून ते स्वर्गात गेले. रमजानच्या दर शुक्रवारी मुस्लीम बांधव इथं नमाजसाठी येतात. (जेरूसलेम वाद)
दी वाॅल : ज्यूंच्या भागात कोटेल किंवा वेस्टर्न वाॅल आहे. असं सांगितलं जातं की, पूर्वी इथं मंदीर होतं. मात्र, ते मंदीर काळाच्या ओघात राहिलं नाही. मात्र, त्याची एक भिंत शिल्लक आहे. ज्यूंना असं वाटतं की, जगाची निर्मिती ज्यापासून झाली, तो फाऊंडेशन स्टोन इथंच होता. याच ठिकाणी अब्राहमने त्याच्या इसाक या मुलाचा त्याग करायचा ठरवलं. आज वेस्टर्न वाॅलमध्ये ज्यू प्रार्थना करतात.
या धार्मिक स्थळांवरून दिसतंय काय? तर फाऊंडेशन स्टोन हे ठिकाणी पॅलेस्टिनी मुस्लीम आणि इस्त्राईली ज्यू या दोघांसाठीही धर्माच्या दृष्टीने महत्वाचा आहे. याच फाऊंडेशन स्टोनजवळ अब्राहमने आपल्या मुलाचा त्याग केला आणि याच ठिकाणीवरून प्रेषित मोहम्मद हे स्वर्गात गेले. या इतिहासाचा विचार केला, तर आज दोन देशांमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे ‘फाऊंडेशन स्टोन’ आहे.
जेरूसलेम शहराचा खरा वाद काय? 
१९६७ साली इस्त्राईलनं पूर्व जेरूसलेमचा ताब्यात घेतला होता. इतकंच नाही, हे अख्खं शहर आमच्याच मालकीचं आहे, असं छातीठोकपणे सांगितलं. पूर्वीपासून पॅलेस्टाईन हा देश स्वातंत्र्याची कास धरून बसला आहे. त्या स्वतंत्र देशाची राजधानी पूर्व जेरुसलेम असेल, हे पॅलेस्टाईन देशाला वाटतं. हा वाद मागील वर्षी न्यायालयात गेला होता.
याच वादावर १० मे २०२१ रोजी इस्त्राईलच्या सर्वोच्च न्यायालयात पूर्व सुनावणी होणार होती. या न्यायालयाच्या सुनावणीत पूर्व जेरूसलेममधून पॅलेस्टाईन लोकांना बाहेर काढलं जाईल अशी भिती होती. त्यामुळे शुक्रवारी ७ मे २०२१ रोजी अल-अक्सा मशीद परिसरात नमाजसाठी जमलेल्या हजारो मुस्लिम आणि तिथेच असणारे इस्त्राईली पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली होती.
पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनांकडून इस्त्राईलवर राॅकेट हल्ला करण्यात आला आणि प्रतिउत्तरादाखल इस्त्राईलनं गाझा पट्ट्यात हवाई हल्ला सुरू करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर हमासनं म्हटलं होतं की, “गाझावर आमचा ताबा आहे. त्याचबरोबर जेरुसलेममध्ये असणाऱ्या अल-अक्सा मशीदीचं संरक्षण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही ५ मिनिटांत १३७ राॅकेट्स डागली आहेत आणि असंच युद्ध सुरू राहिलं तर आणखी हल्ले करण्याची तयार आमची आहे”, अशी धमकी इस्त्राईला हमासनं दिली होती.
हे वाचलंत का?

Back to top button