व्हिएतनाम विरोधातील २० वर्षांच्या युद्धातील मृतांपेक्षा अधिक लोक अमेरिकेत कोरोनाने मृत्यूमुखी! | पुढारी

व्हिएतनाम विरोधातील २० वर्षांच्या युद्धातील मृतांपेक्षा अधिक लोक अमेरिकेत कोरोनाने मृत्यूमुखी!

न्यूयॉर्क / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे २ हजार ५०२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने बुधवारी ही माहिती दिली. मृतांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून वाढली आहे. बाल्टिमोर युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत कोरोनाने कमीतकमी ६० हजार ३५३ लोकांचा बळी गेला आहे.

अमेरिकेत रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे. याउपर देशात ठिकठिकाणी लॉकडाऊन हटविण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात येत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षही लॉकडाऊन हटविण्याच्या बाजूने असून, न्यूयॉर्कसह काही प्रांतांचे गव्हर्नर तसेच देशातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ लॉकडाऊन हटविण्याच्या विरोधात आहेत.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशभरातील सर्व प्रांतांतून लॉकडाऊन आता हटवायलाच हवा, असे आग्रही प्रतिपादन केले आहे. देशभरात लॉकडाऊनविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे विविध प्रांतांचे गव्हर्नरही आपापल्या प्रांतांतून लॉकडाऊन हटविण्याबाबत, निर्बंध शिथिल करण्याबाबतच्या योजना आखत आहेत.

अर्थात, अमेरिकेत अजूनही १० लाखांवर लोक संक्रमित आहेत. १९५५ ते १९७५ पर्यंत चाललेल्या व्हिएतनाम युद्धातील मृतांच्या संख्येपक्षा अधिक लोक अमेरिकेत कोरोनाने मरण पावले आहेत. व्हिएतनाम युद्धात ५८ हजार २२० लोक मरण पावले होते. १० लाखांहून अधिक संक्रमित असलेला अमेरिका हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी कोरोनाचे एपिसेंटर बनलेले आहे.

एकट्या न्यूयॉर्कमध्ये ३ लाखांहून अधिक संक्रमित आहेत. २२ हजार लोक मरण पावले आहेत. मॅसाचुसेटस्, इलिनॉयस, कॅलिफोर्निया आणि पेन्सिल्व्हेनिया या राज्यांतून संक्रमितांचा आकडा प्रत्येकी ४० हजारांवर गेलेला आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सन्मानार्थ अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या आसमंतातून फायटर जेटस्ने ‘फ्लाय पास्ट’ सादर केला. लोकांनी हा नजारा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. 

मटण ही मूलभूत गरज : ट्रम्प 

ट्रम्प यांनी देशभरातील मटण प्लांट सुरू करण्यास परवानगी दिली असून, मटण हे मूलभूत गरजांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. देशातील सर्वात मोठ्या मॉलचालकाने १० राज्यांतील ४९ शॉपिंग सेंटर पूर्ववत सुरू करण्याची तयारी चालविली आहे.

Back to top button