दिलासा! इटलीतील बर्गामो शहर हर्ड इम्युनिटीच्याजवळ पोहोचले! | पुढारी

दिलासा! इटलीतील बर्गामो शहर हर्ड इम्युनिटीच्याजवळ पोहोचले!

रोम/वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

चीनच्या वुहानमधून उद्भवलेल्या कोरोना विषाणूने अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, स्पेन, भारतासह अनेक देशांतून उपद्रव माजवलेला आहे. चीननंतर सर्वात आधी या विषाणूने इटलीत हाहाकार निर्माण केला. 6 कोटी लोकसंख्येच्या या देशात 2.34 लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले आणि 34 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला. आता याच देशातून अवघ्या जगाला दिलासा देणारी एक बातमी आली आहे. इटलीतील एक शहर हर्ड इम्युनिटीच्या जवळ पोहोचलेले दिसत आहे. 

एखाद्या आजाराविरुद्ध लसीकरणाच्या मदतीने मोठ्या लोकसंख्येचा बचाव होतो तेव्हा उरलेले लोकही या आजारापासून सुरक्षित होतात. याचा अर्थ लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी (अर्जित रोगप्रतिबंधक क्षमता) आलेली असते. हर्ड इम्युनिटीची आणखी एक स्थिती म्हणजे एखादा आजार मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचतो तेव्हा उरलेले लोक यापासून आपोआप सुरक्षित होतात. पुढे हे सगळे सुरक्षित झालेले लोक आपोआप बाधित व्यक्तींची रोगप्रतिबंधक क्षमता (त्या आजाराविरुद्धची) वाढविण्यात सहाय्यभूत ठरतात. बर्गामो या इटलीतील शहरात 23 एप्रिल ते 3 जूनदरम्यान 10 हजार लोकांच्या रक्ताची चाचणी घेण्यात आली. तेव्हा तज्ज्ञांना सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. 57 टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक अँडिबॉडीज् विकसित झालेल्या आहेत. 

साथरोग चिकित्सा क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते, जगभरातील 60 ते 70 टक्के लोकसंख्या कोरोना संक्रमित झाल्यानंतर जगभरातच ही हर्ड इम्युनिटीची स्थिती निर्माण होऊ शकते. असे झाल्यास कोरोनामुक्ती आपोआपच होईल. तथापि, कोरोनाच्या अँटिबॉडीज् ज्या लोकांत तयार झाल्या आहेत, ते लोक पुढे किती काळ विषाणूपासून सुरक्षित राहतील, याबाबत मात्र अद्याप संशोधन सुरू आहे. बर्गामो शहरात फेब्रुवारीत पहिला रुग्ण आढळला होता. पुढे कडक लॉकडाऊन या शहरात लागू करण्यात आला. आठवड्यापूर्वीच तो सैल करण्यात आला आहे.

महामारी संपलेली नाही : फॉसी

कोरोना महामारी संपलेली नाही, असा इशारा अमेरिकेतील संक्रमण रोग विशेषज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी दिला आहे. विषाणूने चार महिन्यांत अवघे जग हलवून सोडले आहे. लवकरच यावर व्हॅक्सिन बाजारात येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

बुरुंडी : राष्ट्राध्यक्षांचे निधन

बुरुंडीचे राष्ट्राध्यक्ष पिएरे नकुरुंजिजा यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी अनेकांच्या मते त्यांना कोरोनाची लागणही झालेली होती. 55 वर्षीय पिएरे ऑगस्टमध्ये पदत्याग करणार होते. बुरुंडीच्या फर्स्ट लेडी डेनिस बुकुमी यांच्यावर केनियातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या पिएरे यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच त्या बुजुमबारासाठी निघाल्या आहेत. 

ब्राझील : 32 हजार नवे रुग्ण

मंगळवारचा दिवस ब्राझीलसाठी कमालीचा चिंताजनक ठरला. 32 हजार 91 नवे रुग्ण समोर आले. गेल्या चार दिवसांपासून दररोज नवे 30 हजार रुग्ण आढळत आहेत. राष्ट्रपती बोल्सोनोरो यांच्याविरुद्ध जनमत तयार होत असतानाही ते महामारीमुळे देश बंद करण्याच्या विरोधात कायम आहेत.

पाकिस्तानवर दबाव

पाकिस्तानने लॉकडाऊन लागू करावा म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने दबाव आणलेला आहे. पाकिस्तानातील रुग्णसंख्या 1 लाख 10 हजारांवर गेली आहे. आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, प्रत्यक्षात पाकिस्तानात याहून किती तरी पटीने अधिक रुग्ण आहेत.

संक्रमितांपैकी 49 टक्के बरे

जगभरातील संक्रमितांचा आकडा 73 लाख 54 हजार 855 वर गेला असून, आजअखेर 4 लाख 14 हजार 396 जणांचा मृत्यू झाला आहे. संक्रमितांपैकी 49 टक्के म्हणजेच 36 लाख 22 हजार 631 लोक बरे झाले आहेत. रशियात 24 तासांत नवे 8 हजार 404 रुग्ण आढळले आहेत. 

Back to top button