फ्रान्सविरोधात मुस्लिम देशांमध्ये आंदोलनाची लाट; ढाक्यात मोर्चा | पुढारी

फ्रान्सविरोधात मुस्लिम देशांमध्ये आंदोलनाची लाट; ढाक्यात मोर्चा

ढाका : वृत्तसंस्था

फ्रान्सविरोधात मुस्लिमबहुल आणि इस्लामिक देशांमध्ये आंदोलन तीव्र होत चालले आहे. ढाक्यात  इस्लामिक संघटनांनी फ्रान्सविरोधात मोठा मोर्चा काढला. फ्रान्सविरोधातील मोर्चाच्या आडून पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशमध्येही इस्लामिक कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य  पाठ्यस्वरूपात शिकवत असताना, वृत्तपत्र संपादकांपासून ते कर्मचार्‍यांपर्यंतच्या सामूहिक हत्याकांडाला कारणीभूत ठरलेली ‘चार्ली हेब्दो’तील प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची अर्कचित्रे विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने दाखविली होती. त्याचा राग येऊन एका मुस्लिम युवकाने या शिक्षकाचा गळा चिरला होता. अवघे जग या घटनेने हादरल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लाम हा धर्म नसून, जगावर ओढविलेले एक संकट आहे, असे वक्तव्य केले होते. आता मॅक्रॉन यांच्या या वक्तव्याविरुद्ध अवघे मुस्लिम जग एकवटत आहे. 

बांगलादेशच्या राजधानीत मॅक्रॉन यांच्या वक्तव्याविरुद्ध प्रचंड मोर्चा काढण्यात आला. सुमारे 10 हजार जण त्यात सहभागी झाले. या मोर्चातही फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार  घालण्याचे आवाहन करण्यात आले. 

कट्टरपंथी मुस्लिम युवकाने शिक्षकाची हत्या केल्यानंतर फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली. कट्टरवादी संघटना, संस्था सुरक्षा यंत्रणांच्या ‘रडार’वर आल्या.

फ्रान्स-तुर्कस्तान वैमनस्यात वाढ

फ्रान्स आणि तुर्कस्तानचे संबंधही या घटनेमुळे आणखी बिघडू लागले आहेत. तुर्क राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोआन यांनी मॅक्रॉन यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

Back to top button