जयेश यांच्या पक्षप्रवेशापूूर्वी भाजपात धूमशान | पुढारी

जयेश यांच्या पक्षप्रवेशापूूर्वी भाजपात धूमशान

पणजी ः पुढारी वृत्तसेवा :  साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांच्या पक्ष प्रवेशाला प्रखर विरोध होऊ लागला आहे. या पक्षप्रवेशाला विरोध होत असल्याने भाजपची साळगाव मंडळ समिती, विविध मोर्चाच्या समित्या आणि प्रकोष्ट समित्या बरखास्त करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली आहे. दरम्यान, रात्री उशिरा जयेश साळगावकर यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सादर केला.

साळगावकर विधानसभा संंकुलात मागच्या दाराने आत आले होते. त्याआधी त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा पक्षाला सादर केला आहे. साळगावकर यांच्या भाजप पक्षप्रवेशाची माहिती देण्यासाठी साळगाव मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक भाजपच्या राज्य मुख्यालयात गुरुवारी सायंकाळी उशिरा बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत हा विषय समजताच जोरदार घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते निघून गेले.

त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला चार खडे बोल सुनावलेही. साळगावकर आणि फोेंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या भाजप प्रवेशाची आता केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. भाजपकडून अधिकृतपणे याची घोषणा केली जात नसली तरी आज, शुक्रवारी दुपारी चार वाजता साळगावकर आणि त्यानंतरच्या दोन चार दिवसांत नाईक भाजपवासी होतील, अशी खात्रीलायक माहिती आहे. त्याआधीच हे नाट्य आकाराला आले आहे.

साळगाव मतदारसंघातील भाजपचे नेते फोंडू नाईक म्हणाले, भाजप आमचा पक्ष आहे; पण या नेत्यांनी मतदारसंघाचा घात केला आहे. 18 वर्षे मी पक्षाचे काम करत आहे. साळगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्याविषयी अनुद्गार काढले आहेत, अशा व्यक्तीला कोणत्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता पक्षात घेण्याचे ठरवले जाते याचे फार वाईट वाटते. 4 ऑगस्टला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांतील एकाला उमेदवारी देणार असे सांगितले होते. त्यांनीही आमचा घात केला आहे. यापुढे काय करावे ते कार्यकर्तेच ठरवतील. अपक्ष उमेदवार उभा करण्याचा विचार आहे.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोचले होते. अपक्ष आमदार प्रसाद गावकर हेही त्यांच्यासोबत होते. या दौर्‍यात साळगावचे आमदार जयेश साळगावकर उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी दांडी मारली. यापूर्वी गोवा फॉरवर्डच्या काही जाहीर कार्यक्रमांना साळगावकर दिसत नव्हते. एकावेळी त्यांनी आपली आई गोमेकॉत असल्याने आपण पक्षाच्या मंचावर उपस्थित नव्हतो, असा खुलासा केला होता.

दिल्ली दौर्‍यासाठी त्यांच्याकडे पक्षाने हवाई प्रवास तिकीटही पाठवले होते. मात्र, कोणीतरी निधन पावल्याचे कारण सांगत त्यांनी दिल्लीला जाण्यास असमर्थता व्यक्तकेली होती. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांच्या ते संपर्कात नाहीत. त्यांनी सर्वांना ज्ञात असलेला मोबाईल क्रमांकही बंद ठेवला आहे. साळगावकर यांचे सत्ताधारी भाजपशी असलेले सख्य दडून राहिले नव्हते. मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतो.

त्यात राजकीय असे काहीच नाही, असे ते सांगत आले आहेत. आता अखेर भाजपवासी होण्याचा त्यांचा निर्णय झाला आहे. गोवा फॉरवर्ड यांच्या उमेदवारीवर ते निवडून आल्याने आणि पालयेकर सोबत नसल्याने आमदारकीचा राजीनामा देणे त्यांना भाग पडले आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता हा पक्ष प्रवेश होईल, असे सांगण्यात येत आहे. या घडामोडींची दखल गोवा फॉरवर्डने घेतली आहे. त्यांनी साळगावकर यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी याबाबत सांगितले की, तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे, साळगावकर यांना भाजपवासी होण्यास सरदेसाई यांनी मोकळीक दिली आहे. साळगावकर यांना पक्षातून कोणीही मुक्त केलेले नाही. याउलट ते पक्षविरोधी कारवाया करतात म्हणून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिल्लीत गेले नसलेले गोवा फॉरवर्डचे आमदार (साळगावकर) भाजपमध्ये येतील, असे सांगितले होतेे.

भाजपचे संघटन सचिव सतीश धोंड यांनी मोन्सेरात यांना हे विधान करायला लावले आहे. त्या विधानाचे खंडन साळगावकर यांनी केलेले नाही म्हणून नोटीस बजावली आहे. श्री देव बोडगेश्वरासमोर आम्ही भाजपसोबत जाणार नाही, अशी शपथही घेतली आहे. निवडणुकीला अद्याप तीन महिन्यांचा अवकाश असतानाच साळगावकर भाजपवासी होत असतील तर त्यांना देवाचे देखील भय राहिलेले नाही, असे म्हणता येते. नोटिशीला उत्तर न दिल्यास कारवाई करणार आहोत.

नाईक यांच्याशीही भाजप संपर्कात आहे. फोंडा पालिकेवर रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांची वर्णी लावायची आणि रवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करायचा असे अनौपचारिकरीत्या ठरले होते. फोंडा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांविरोधात अलीकडच्या काळात आलेल्या अविश्वास ठरावांमागे हे कारण होते. मात्र, भाजपचेच शांताराम कोलवेकर यांनी हा डाव आकाराला आणू दिला नाही. त्यांनी नगराध्यक्षपदी आपण निवडून येण्यासाठी मुत्सद्देगिरी वापरली.

कोलवेकर त्यावेळी भाजपचे फोंडा मंडळ अध्यक्ष होते. केवळ त्या पदावरून त्यांना हटवून कारवाईचे नाट्य भाजपकडून आकाराला आणण्यात आले. मात्र, नाईक यांच्या अटीची पूर्तता करण्यास भाजपला यश आले नाही. निवडणुकीच्या तोंडावर फोंडा तालुक्यातील राजकीय नेपथ्य व्यवस्थित असण्यासाठी नाईक यांनी सत्ताधारी पक्षात असणे भाजपला गरजेचे वाटते. फोंडा येथे काँग्रेसने माजी मंत्री शिवदास वेरेकर यांचे पुत्र राजेश यांना प्रवेश दिला आहे.

नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर केलेले शाब्दिक शरसंधान आणि चोडणकर यांनी दिलेली प्रत्युत्तरे पाहता रवी यांची काँग्रेसमध्ये् घुस्मट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच त्यांनी आपण मडकईतून प्रसंगी अपक्षही लढू शकतो, असे जाहीर केले होते. मगोचे नेते युतीसाठी बधत नसल्याने मडकईत मगोचे सुदिन ढवळीकर यांच्यासोमर रवी यांचे तगडे आव्हान उभे करायचे भाजपने ठरवले आहे. त्यामुळे त्याचाही भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

Back to top button