नवाब मलिक म्हणाले, नेत्यांनी तपासयंत्रणांची भीती मनातून काढून टाकावी | पुढारी

नवाब मलिक म्हणाले, नेत्यांनी तपासयंत्रणांची भीती मनातून काढून टाकावी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्षातील नेत्यांना भीती दाखवत आपल्या पक्षात घेतले. माणूस भीतीने रोज मरत असतो. त्यामुळे ‘जो डर गया वो मर गया,’ असे म्हणत महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनातील भीती दूर केली पाहिजे,’ असे प्रतिपादन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले.

पुणे शहरातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने नवाब मलिक यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे, अभय छाजेड, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेविका मंदा लोणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

‘शरद पवार यांना ईडीने पाठवलेली नोटीस कायदेशीर नव्हे, तर ती लढाई राजकीय होती. शरद पवार यांनी स्वतः ईडीच्या कार्यालयात येणार अशी घोषणा केली. त्यावेळी ईडीला नोटीस मागे घेत असल्याचे जाहीर करावे लागले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सरकारला बदनाम करण्यासाठी सातत्याने भाजपकडून प्रयत्न झाले. त्यातूनच अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येत आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्याचा खोडसाळपणा करण्यात आला; परंतु त्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग होऊनही त्यातून काय साध्य झाले,’ असा सवाल मलिक यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घरी आणि नातेवाइकांच्या घरी छापेमारी करून एखादा पक्ष बाजूला काढायचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजप नेत्यांनी समजून घ्यावे, एकही पक्ष कोणाच्या बापाला घाबरत नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल,’ असा विश्‍वास मलिक यांनी व्यक्त केला. ‘भाजप आपली सत्ता ज्या राज्यात आहे, त्या ठिकाणी काहीच करू शकला नाही. परंतु इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात ईडी, प्राप्तिकर विभाग आणि अन्य केंद्रीय गुप्तचर विभागाची भीती दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप नेत्यांनी मंदिराच्या जागा विकल्या असून, त्याचा लवकरच भांडाफोड करणार आहे. ड्रग्ज व्यवसाय कोण चालवत आहे, याची सीडी माझ्याकडे आहे. ती बाहेर काढल्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही,’ असा इशाराही मलिक यांनी दिला.

Back to top button