पिंपरी : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतले ७० हजार, महिला पीएसआय जाळ्यात - पुढारी

पिंपरी : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतले ७० हजार, महिला पीएसआय जाळ्यात

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा 

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाखांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडी अंती सत्तर हजार रुपये स्वीकरताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिरीक्षक महिलेसह एका कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले. मात्र, कर्मचाऱ्याने पथकातील सदस्यांना धक्काबुक्की करीत पळ काढला. हा प्रकार गुरुवारी (दि. २) सांगवी येथे घडला.

उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके (वय २८) पोलिस कर्मचारी अशोक बाळकृष्‍ण देसाई असे लाच घेणाऱ्या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल आहे. या अर्जावरून तक्रारदार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली.

या विरोधात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. त्यानुसार, लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपींना सत्तर हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

मात्र, आरोपी देसाई हा लाचलुचपत विभागातील सदस्यांना धक्का देवून दुचाकीवर लाच घेतलेल्या रक्कमेसह पळून गेला. उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, कर्मचारी शेख, नवनाथ वाळके, वैभव गिरीगोसावी, पूजा पागिरे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हे ही वाचलं का?

Back to top button