संशोधकांनी बनवला असा ‘रोबो’ जो चक्क प्रजननही करू शकतो! | पुढारी

संशोधकांनी बनवला असा ‘रोबो’ जो चक्क प्रजननही करू शकतो!

लंडन : सध्या हरेक नमुन्याचे रोबो तयार करण्यात आले आहेत. युद्धभूमीवर लढण्यापासून ते शस्त्रक्रिया करण्यापर्यंत आणि घरगुती कामे करण्यापासून ते फूड डिलिव्हरी करण्यापर्यंतची अनेक कामे करणारे रोबो जगभरात पाहायला मिळत आहेत. आता संशोधकांनी जगातील पहिलाच असा ‘रोबो’ बनवला आहे जो चक्क प्रजननही करू शकतो. मिलीमीटर आकाराच्या या जिवंत यंत्राला ‘जेनोबॉटस् 3.0’ असे नाव देण्यात आले आहे.

जेनोबॉट हा पारंपरिक रोबोही नाही की एखादा सजीव प्रजातीही नाही. तो सजीव हालचाली करणारा नवा जीव आहे. बेडकाच्या पेशी आणि कॉम्प्युटरच्या डिझाईनपासून अमेरिकेतील संशोधकांनी हा जेनोबॉट विकसित केला आहे. तो ‘पॅक-मॅन’सारख्या आपल्या तोंडात एकल पेशींना गोळा करतो आणि ‘भ—ूणां’ना बाहेर काढतो जे आपल्या माता-पित्यासारखेच दिसतात आणि हालचाल करतात. असे स्व-प्रतिकृती जैव-रोबो वेदनादायक घाव, जन्मदोष, कर्करोग तसेच उतारवयातील समस्यांवरील उपचारासाठी मदत करू शकतो.

टफ्टस युनिव्हर्सिटी आणि वर्मोंट युनिव्हर्सिटीच्या जैववैज्ञानिक तसेच कॉम्प्युटर वैज्ञानिकांनी घडवलेला हा विज्ञानाचा चमत्कार आहे. ‘जेनोबॉटस् 3.0’ हा आपल्या मूळ स्वरूपाचे म्हणजेच ‘जेनोबॉटस्’चे अनुसरण करतो. असा जेनोबॉट 2020 मध्ये बनवला होता आणि त्याला ‘जगातील पहिला जिवंत रोबो’ म्हटले गेले होते. ‘जेनोबॉटस् 2.0’ सिलिया नामक आपल्या पायांचा वापर करून स्वतःला पुढे नेऊ शकत होता तसेच त्याच्यामध्ये स्मरणशक्तीही होती. वर्मोंट युनिव्हर्सिटीतील रोबोटिक्स तज्ज्ञ जोशुआ बोंगार्ड यांनी सांगितले की आता हे नवे जेनोबॉटस् आपली संख्याही वाढू शकतात.

Back to top button