देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ सत्तेसाठी डाव्यांच्या मांडीला मांडी | पुढारी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ सत्तेसाठी डाव्यांच्या मांडीला मांडी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी करणारेच आता केवळ सत्तेसाठी डाव्या पक्षांतील नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ते नेते सावरकरांवर टीका करतात तरी देखील हे गप्प बसतात, अशी टीका ठाकरे सरकारवर करत अर्बन नक्षलवाद्यांना हे प्रोत्साहित करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत केला.

व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठशताब्दीपूर्ती हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात पार पडला. यावेळी शेवडे यांच्या ‘डावी विष वल्ली’ या 50 व्या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना नक्षलवाद्यांना आता डाव्यांचा खरा चेहरा समजून आला असून ते गरीब आदिवासी ऐकत नसल्याने यांनी नागपूर, दिल्ली, मुंबई यासारख्या शहरातील महाविद्यालयात अर्बन नक्षलवादाचे विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्यास सुरुवात केली आणि त्यांना विचारवंत म्हणून त्यांना पदवी दिली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस केला. विशेष म्हणजे हे करताना केवळ दहशतवादाला आर्थिक पाठिंबा देण्याचे काम देखील डावे करतात असे सांगतानाच त्रिपुरा मध्येही अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो आहे असे सांगून या पद्धतीने दंगली घडवून त्याचे बीज संपूर्ण देशात पेरायचे काम राहुल गांधी सारखे नेते करत असल्याचे त्यांनी सांगितले.

गरीब, वनवासी , वंचित यांची डोकी भडकवून त्यांना दंगली करण्यास भाग पाडले आहे, असे सांगतानाच त्यांनी भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळी देखील असेच केले. मात्र पोलिसांनी त्यांचा बुरखा टराटरा फडला असल्याचं त्यांनी नमूद केले. तसेच सावरकरांच्या राष्ट्र भक्तीचा गुण गौरव करण्याचे सोडून त्यांनाच हे लोक देशद्रोही ठरवण्यात माहीर आहेत असे त्यांनी सांगितले.

खासदारांच्या निलंबनाच्या वेळीदेखील अशाच प्रकारे माफी मागण्यासाठी सांगितले असता आम्ही सावरकर आहोत का ? असा प्रश्न विचारला. यावेळी यांना लाज वाटायला हवी होती. सावरकर होण्याची पात्रता तुमच्यात नाहीच असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

तर सच्चीदानंद शेवडे यांनी देखील डावे आणि उजवे असा कोणताही भेद नाही मात्र डाव्यानीच आम्ही उजवे असल्याचे जाहीर केले आहे. सावरकरांच्या राष्ट्रभक्ती ने आम्ही प्रेरित झालो असून समाज माध्यमातून व्यक्त होणारी तरुण पिढी देखील फार हुशार आणि वाचन करून लिहिते. त्यामुळे बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा अशा विचारांची ही पिढी असल्याने कौतुक वाटते असे त्यांनी सांगितले. शेवडे यांनी डाव्यांनी अपले डोके गहाण ठेवले असल्याचे उदाहरणासह सांगितले. यावेळी त्यांनी देखील महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण, भाजपा आमदार गणपत गायकवाड,माजीमंत्री जगन्नाथ पाटील, पंचायत राज मंत्री कपिल पाटील, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ लेखक, प्रवचनकार सु. ग. शेवडे, पै लायब्ररी चे संस्थापक पुंडलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button