गोव्यातील बेकायदा कत्तलखाने बंद न केल्यास तीव्र आंदोलन : सतीश प्रधान | पुढारी

गोव्यातील बेकायदा कत्तलखाने बंद न केल्यास तीव्र आंदोलन : सतीश प्रधान

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात बेकायदा पद्धतीने गोवंश हत्या करणारे कत्तलखाने सुरू आहेत. हे बेकायदा कत्तलखाने त्वरित बंद करावेत व गोवंशाचे संरक्षण करावे, नाहीतर राष्ट्रीय गोरक्षा अभियान गोव्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रीय गोरक्षा संघटना प्रमुख सतीश प्रधान यांनी दिला आहे. पणजी येथील आझाद मैदानावर गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना प्रधान यांनी हा इशारा दिला.
यावेळी राष्ट्रीय गोरक्षा संघटनेचे संयोजक ऋषी वसिष्ठ, गोवा गोरंक्षा अभियानाचे प्रमुख हनुमंत परब व गोप्रेमी सिद्धेश्वरनाथ मिश्रा उपस्थित होते.

सतीश प्रधान यांनी सांगितले, गोव्यातील गोरक्षा अभियानाला बळ देण्यासाठी व लोकांना गोवंशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी लवकरच गोव्यामध्ये राष्ट्रीय गोरक्षा अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यासाठी भारतातील साधू, संत येणार आहेत. या अधिवेशनापूर्वी गोवा सरकारने राज्यात चालू असलेले बेकायदा कत्तलखाने बंद केले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रधान यांनी दिला. काही पक्षाचे नेते गोमातेचे नाव घेऊन सत्तेवर येतात मात्र सत्ता मिळाल्यानंतर गोरक्षेला महत्त्व देत नाहीत. अशी टीका करून उत्तर भारतात गो तस्करांचा सुळसुळाट सुरू असून गोरक्षक कार्यकर्त्यांना त्यांना रोखावे लागत असल्याचे प्रधान यांनी सांगितले. आपण गो रक्षेसाठी काम करत असल्याने आपल्याला 2016 साली पंजाब सरकारने तीन वर्षे तुरुंगात डांबले.

भारत देश कृषिप्रधान असून देशाची अर्थव्यवस्था गोवंशावर अवलंबून आहे. गोवंशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. गोेव्यात आगामी काळात गोरक्षा राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार असून त्यात गोबरापासून वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यावर भर असेल, अशी माहिती वसिष्ठ यांनी दिली. हनुमंत परब यांनी गोव्यात आपण गोरक्षा अभियान राबवत असल्याने गोवा सरकारने आपणांस गुन्हेगारांच्या यादीत गोवले असे सांगून गोमातेचे संरक्षण करणे हे प्रत्येक सनातनी हिंदूंचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

Back to top button