शिवप्रेमींसमोर कळंगुट पंचायत नमली | पुढारी

शिवप्रेमींसमोर कळंगुट पंचायत नमली

म्हापसा, पुढारी वृत्तसेवा : कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हटवण्याच्या पंचायतीच्या आदेशावरून मंगळवारी सुरू झालेल्या तणावाचे वातावरण सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या माफीनाम्यानंतर निवळले. सलग सहा तास पंचायतीकडून हे माफीनाट्य सुरू होते. या प्रकरणी पंचायतीचा आदेश रद्द करून उपस्थित जनतेची माफी मागितल्यानंतर पंचायतीवर चाल करून आलेले हजारो शिवप्रेमी शांत झाले. कळंगुट पंचायतीला शिवप्रेमींसमोर अखेर नमावेच लागले.

याबाबतचे वृत्त असे, कळंगुट येथील शिवस्वराज्य या संघटनेने 3 जून रोजी कळंगुट पोलिस स्थानकाजवळ अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. पुतळा उभारण्याच्या एक महिन्यापूर्वी या संघटनेने कळंगुट पंचायतीकडे रितसर परवानगी मागितली होती. एक महिन्यानंतर या पंचायतीने काहीच न कळवल्यामुळे पंचायतीची परवानगी ग्राह्य धरून हा पुतळा उभारण्यात आला होता.

त्यानंतर 19 जून रोजी कळंगुट पंचायतीने एका आदेशाद्वारे शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर यांना हा पुतळा बेकायदा असून तो त्या ठिकाणाहून दहा दिवसांच्या आत हटवावा, असे कळवले. हा आदेश मिळताच अध्यक्ष मठकर यांनी या आदेशाची प्रत सोशल मीडियावरून व्हायरल केली व गोव्यातील तमाम शिवप्रेमींना 20 जून रोजी सकाळी कळंगुट येथील शांतादुर्गा देवस्थानात जमण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानुसार, संपूर्ण गोव्यातील हजारो शिवप्रेमी सकाळी 11 वा. शांतादुर्गा देवस्थानात जमा झाले व तेथे देवीला घार्‍हाणे घालून तेथून त्यांनी पंचायतीवर मोर्चा वळवला. यावेळी शिवप्रेमींना भगवे झेंडे देण्यात आले. पंचायतीवर जाताना शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी ते पंचायतीच्या निषेधाच्याही घोषणा देत होते. यावेळी कळंगुट पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु शिवप्रेमींची गर्दी वाढू लागल्यामुळे म्हापसा, पर्वरी, कळंगुट, हणजूण येथील पोलिस फौजफाटा मागवण्यात आला होता.

सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या माफीनाम्यावर ठाम असलेले शिवप्रेमी संध्याकाळी 5.30 पर्यंत पंचायतीबाहेर ठिय्या देऊन होते. दरम्यानच्या काळात उपस्थित पोलिस अधिकारी व उपजिल्हाधिकारी सरपंचाकडे जाऊन विनवणी करीत होते. शेवटी साडेपाचच्या सुमारास सरपंच जोसेफ सिक्वेरा हे पोलिस बंदोबस्तात पंचायत गृहाच्या दारात आले. यावेळी अधीक्षक निधीन वाल्सन यांनी उपस्थित पत्रकारांना जवळ बोलावले. त्यानंतर सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पत्रकारांसमक्ष पंचायतीने दिलेला आदेश मागे घेत असल्याचे व या प्रकारामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे सांगून पुन्हा आत निघून गेले, त्यानंतर या संपूर्ण नाट्यावर पडदा पडल्यावर उपअधीक्षक जीवबा दळवी, अधीक्षक निधीन वाल्सन यांनी उपस्थित शिवप्रेमींना निघून जाण्यास सांगितले.

उपस्थित शिवप्रेमींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधीक्षक वाल्सन, आयपीएस अधिकारी सचिन यादव, उपाधीक्षक जीवबा दळवी, उपअधीक्षक विश्वेश कर्पे, उपअधीक्षक राजेश कुमार, निरीक्षक परेश नाईक, निरीक्षक प्रशांत देसाई, निरीक्षक अनंत गावकर, निरीक्षक सिताकांत नाईक, निरीक्षक नारायण चिमूलकर, निरीक्षक सुजय कोरगावकर, निरीक्षक नितीन हळर्णकर व इतर पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होते.

पंचायतीवर दगडफेक

कळंगुट पंचायतीसमोर शिवप्रेमी शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा देत होते. दुपारी 1 पर्यंत सरपंचांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने जमलेल्या शिवप्रेमींनी पंचायतीवर दगडफेक करून पंचायतीच्या काचा फोडल्या. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी. व इतर अधिकार्‍यांनी पंचायतगृहात जाऊन सरपंचांशी चर्चा केल्यावर सरपंचांनी 19 रोजी दिलेला आदेश स्थगित करीत असल्याचे लिहून दिले. तसेच उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी. यांनी बाहेर येऊन उपस्थितांना वाचून दाखवले; परंतु उपस्थित शिवप्रेमी आदेश रद्द करण्यावर व सरपंचांच्या माफीवर ठाम होते. सायंकाळी चारच्या दरम्यान कळंगुट पंचायतीने आदेश मागे घेत असल्याचे कळंगुट पोलिसांना व शिवस्वराज्य संघटनेला लिहून दिल्याचे दुसर्‍यांदा उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी. यांनी शिवप्रेमींना सांगितले.

Back to top button