गोवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला येणार १६ हजार प्रतिनिधी : मंत्री गोविंद गावडे | पुढारी

गोवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला येणार १६ हजार प्रतिनिधी : मंत्री गोविंद गावडे

पणजी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात होणार्‍या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सुमारे ८ हजार खेळाडू आणि तेवढेच तंत्रज्ञ येण्याची शक्यता असल्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. रविवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सदस्यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम आणि मिरामार येथे पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

गावडे म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्यातील मूलभूत सोयी पूर्णपणे तयार आहेत. केवळ सजावट आणि इतर गोष्टींचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील दोन दिवस समितीतर्फे पणजी, फातोर्डा आणि पेडे येथील मैदानांची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर तांत्रिक समितीची दौरा होईल.

ते म्हणाले, सध्या क्रीडा खात्याने स्पर्धेची स्थळे ठरवली आहेत. यानंतर तांत्रिक समितीकडून स्पर्धा स्थळांचा आढावा घेऊन सूचना केल्या जातील, त्या लक्षात घेऊनच आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करणार आहोत. यामध्ये स्पर्धा स्थळ, खेळाडूंच्या राहण्याची सोय, सरावासाठी मैदानांची निवड करण्यात येईल.

राज्यात २०१५ साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार होत्या. मात्र, काही कारणास्तव होऊ शकल्या नाहीत. यंदा येथे १२ ते १३ क्रीडा प्रकार खेळविण्यात येणार आहेत. येथे मेलोड्रोम तसेच शूटिंग रेंज नसल्याने सायकलिंग आणि नेमबाजीच्या स्पर्धा अन्यत्र घेण्यात येतील.

गोवा बनेल क्रीडा पर्यटन स्थळ

पाहणी केल्यावर आयओएचे सदस्य अमिताभ शर्मा म्हणाले, राष्ट्रीय स्पर्धा गोव्यासाठी मैलाचा दगड ठरतील. या स्पर्धेमुळे गोवा क्रीडा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस येऊ शकते.

Back to top button