गोवा : वाढत्या पर्यटनामुळे पर्यावरणाचा र्‍हास : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत | पुढारी

गोवा : वाढत्या पर्यटनामुळे पर्यावरणाचा र्‍हास : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : पुढारी वृत्तसेवा : वाढत्या पर्यटनामुळे राज्यातील पर्यावरणाचा र्‍हास होत आहे; मात्र राज्य सरकार गोव्याला हरित राज्य बनविण्यासाठी वचनबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. रविवारी ‘सीएमएस वातावरण’ या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आयसीयूएनचे शॉन साउदी आणि डॉ. वासंती राव उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गोवा हे जागतिक स्तरावरील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे येथे घरांच्या तसेच अन्य मूलभूत सुविधांच्या मागणीत वाढ झाली आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यात जंगलतोड होऊन किनारी भागाचा र्‍हास झाला. राज्यातील प्रदूषणही वाढले आहे. असे असले तरी सरकार विविध धोरणे आणि प्रकल्प आणून पर्यावरणाची काळजी घेत आहे.

ते म्हणाले, या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. यामध्ये वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर करणे, जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरण पूरक इमारती बांधणे आणि प्रकिया न केलेले सांडपाणी नदीत सोडण्यास बंदी यांचा समावेश आहे. सरकार शाश्वत विकास तसेच संसाधने संवर्धनासाठीही प्रयत्नशील आहे.

जल संवर्धन, अक्षय ऊजेला प्रोत्साहन

समाजाच्या तसेच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी पर्यावरण महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व जल संवर्धन तसेच अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणारी धोरणे अवलंबली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण जीवनशैलीचा पुरस्कार केला आहे. त्यानुसार आम्ही लोकांना शाश्वत जीवनशैलीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.

Back to top button