गोवा : फुटिर आमदारांची बोळवण महामंडळांवर | पुढारी

गोवा : फुटिर आमदारांची बोळवण महामंडळांवर

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राज्य मंत्रिमंडळात बदल करण्याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. जे आमदार पक्षांतर करून भाजपात आलेले आहेत, त्यांना आश्वासन दिल्यानुसार महामंडळे दिली जातील, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली आहे. तानावडे यांच्या या प्रतिक्रियेमुळे मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता दुरावली आहे.

शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी तानवडे यांना मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या वृत्ताबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नाही. पक्षीय पातळीवरसुद्धा अशी चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत आपणाला किंवा पक्षाला काही सांगितलेले नाही. मंत्रिमंडळात फेरबदल व्हायचा असल्यास मुख्यमंत्री निश्चितच  पक्षाला कळवतील. मुख्यमंत्र्यांसोबत आपण गेले काही दिवस सातत्याने अनेक कार्यक्रमांत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत कुठलेही भाष्य आपल्यासोबत केलेले नाही, असे तानावडे यांनी सांगितले.

ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत, आमदार मायकल लोबो व आलेक्स सिक्वेरा हे मंत्रिपद मिळणार या आशेने काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यात या तीनही आमदारांना मंत्रिपदाची केवळ हुलकावणी मिळत आहे. ‘ भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मंत्रिमंडळात बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे या तिन्ही आमदारांचे मंत्रिपदाचे स्वप्न तुर्तास अपूर्णच राहणार आहे.

Back to top button