गोवा : सरकारी तांदूळ, गव्हाची विक्री; टोळी गजाआड… दोघे अधिकारी निलंबित | पुढारी

गोवा : सरकारी तांदूळ, गव्हाची विक्री; टोळी गजाआड... दोघे अधिकारी निलंबित

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  गोवा सरकारच्या नागरी पुरवठा खात्याच्या फोेंडा, सांगे व पणजी येथील गोदामातील तांदूळ व गहू चोरून कर्नाटकात विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत पाचजणांना अटक झाली असून दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. तर मुख्य सुत्रधार असलेेल दोन गोदाम मालक फरार आहेत. पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने तीन जागी छापे टाकून 581 पोती तांदूळ व 256 पोती गहू असा एकूण 10 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच चार वाहनेही जप्त केली आहेत.

नागरी पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांंच्या दुर्लक्षामुळे कोरोना काळातील करोडो रुपयांची तूरडाळ व साखर खराब होण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता चक्क खात्याच्या गोदामातील तांदूळ व गहू चोरून तो कर्नाटकात विकण्याचा प्रकार उघड झाला आहे.
गोवा पोलिसांच्या गुन्हे विभागाने मंगळवार दि.15 रोजी कुर्टी, बोरी व कुंडई येथील गोदामावर छापे टाकले व फोंडा, सांगे व पणजी येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून चोरून आणलेले धान्य जप्त केले.

या प्रकरणी हजरत अली सय्यद रा. करंबळी (चालक), विनय कुमार गुड्डीमनी रा. कर्नाटक (चालक), प्रकाश निसीमाप्पा रा. हुबळी, तौसीफ मुल्ला (चालक) व रामकुमार कुर्टी यां पाच जनांना अटक केली. तर गोदामाचे मालक सचिन नाईक बोरकर (फोंडा) व विरेंद्र म्हार्दोळकर हे फरार असून त्यांंचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी या प्रकरणी नागरी पुरवठा खात्याच्या दोघा अधिकार्‍यांना निलंबित केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील तांदूळ चोरून तो नागझर कुर्टी येथील एका खाजगी गोदामात नेऊन साठवला जात होता. तेथून तो कर्नाटकात नेऊन विकला जात होता. मंगळवारी गोवा पोलिसांच्या गुन्हे विभागाने या खाजगी गोदामासह बोरी व कुंडई येथील गोदामावर छापे टाकले असता तेथे बेहिशोबी तांदूळ व गहू सापडला. सदर तांदूळ कर्नाटक पासिंगच्या ट्रकमध्ये भरला जात होता. तेथे एक जीपही होती. ट्रक व जीप पोलिसांनी ताब्यात घेतली. या चौैकशीत येथे असलेला तांदूळ नागरी पुरवठा खात्याच्या पणजी, सांगे व फोंडा येथील गोदामातून आणल्याची कबुली ट्रक चालकांने पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हे नोंद करुन तपास सुरु केला आहे.

सखोल चौकशी : मुख्यमंत्री

या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने कडक कारवाई करत गुन्हा नोंदविला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. विभागाचा अहवाल आल्यावर याबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले

अधिकार्‍यांच्या सहभागाशिवाय कसे शक्य?

तब्बल 2 कोटी पेक्षा जास्त किमतीची तूरडाळ व 5 लाखाची साखर नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात खराब झाली होती. सरकारने तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक यांना निलंबित केले व इतर दोन अधिकार्‍यावर कारवाई केली. तरीही या खात्याचे अधिकारी शहाणे झाले नाहीत कारण त्यांच्या सहभागाशिवाय गोदामातील शेकडो टन तांदूळ चक्क गोदामातून ट्रकात भरून चोरी कसा होऊ शकतो. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button