गोवा : वास्कोत एटीएममधून आले जादा पैसे; लोकांची गर्दी | पुढारी

गोवा : वास्कोत एटीएममधून आले जादा पैसे; लोकांची गर्दी

वास्को; पुढारी वृत्तसेवा : बायणातील छोटा बाजारातील कामत कमर्शियल सेंटर इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून सोमवारी रात्री नमूद केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम बाहेर येऊ लागल्याने तेथे पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी झाली. याची माहिती नगरसेवक रामचंद्र कामत यांनी पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी येऊन तेथील नागरिकांना दूर केले. बँकेच्या संबंधित कर्मचारीने एटीएमचे शटर बंद केल्यावर गर्दी कमी झाली.

आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून अधिक रक्कम येत असल्याचे वृत्त सोमवारी रात्री वार्‍यासारखे पसरले. त्यामुळे तेथे बायणा, मांगोरहिल वगैरे परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. काहीजणांनी एटीएममधून पैसे काढले. त्यांच्या पदरी अपेक्षापेक्षा मोठी रक्कम पडली. तेथे गर्दी वाढू लागल्याने कोणीतरी नगरसेवक रामचंद्र कामत यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले. त्यानंतर गर्दी हळूहळू पांगली. मात्र, बँकेच्या कर्मचार्‍याने त्या एटीएमच्या शटरला कुलूप ठोकल्यावर बरेचजण हळहळले. ज्यांच्या पदरी अधिक रक्कम पडली ते खूश होते. मात्र, ज्यांनी पैसे काढले त्यांची माहिती प्राप्त होणार असल्याने काहीजण चिंतित झाले आहेत. एटीएमच्या मशिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने कदाचित नमूद केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मशिनमधून बाहेर येऊ लागली असावी. या एटीएममधून किती रक्कम काढण्यात आली, हे समजू शकले नाही.

Back to top button