गोवा : दारू पिऊन तर्रर झालेल्यांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी बार मालकांची | पुढारी

गोवा : दारू पिऊन तर्रर झालेल्यांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी बार मालकांची

पर्वरी; पुढारी वृत्तसेवा : दारू पिऊन तर्रर झालेल्या तळीरामांना घरी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी बार मालकांची असेल, याचा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सोमवारी पुनरुच्चार केला. या संदर्भात लवकरच कायदा करणार असल्याचे तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले. वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे राज्यात लक्षणीय संख्येने अपघात होत आहेत. अनेक अपघातांना अति मद्यप्राशन हे कारण असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. बळींची आणि जखमींची आकडेवारीही वाहतूक खात्याने प्रसिद्ध केलेली आहे. या पार्श्वभूमीवर गुदिन्हो यांनी तळीरामांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी बार मालकांच्यावर असेल, असे यापूर्वी म्हटलेले होते. याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. तळीरामांना वाहन चालवण्यापासून अटकाव करण्याचा आणि त्यांच्यामुळे नागरिकांचा बळी जाऊ नये, यासाठी सरकार या उपाय योजना करू पाहत आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

मद्यप्राशन करून वाहन चालवणे गुन्हा आहे. त्यासाठी 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आलेले आहे. त्याचसोबत एखादी व्यक्ती तर्रर झाली तर त्याला त्याच्या घरी पोचवण्याची जबाबदारी बार मालकांची असेल, अशी कायदेशीर तरतूद केली जावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे, अशी माहिती गुदिन्हो यांनी यावेळी दिली.

 

Back to top button