पणजीला धो डाला | पुढारी

पणजीला धो डाला

पणजी : पुढारी वृत्तसेवा हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी सायंकाळी पावसाने पणजीला झोडपून काढले. 5.30 ते 8.30 या तीन तासांत तब्बल 3.09 इंच पावसाची नोंद झाली. जोरदार पावसाने अवघ्या काही मिनिटांतच पणजी पुन्हा एकदा तुंबली. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

पावसामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.पणजीमध्ये बुधवारी सायंकाळी 6.45 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नेहमीप्रमाणे पणजी, मळा, पाटो भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. टोंक परिसरात नारळाचे झाड पडून किरकोळ नुकसान झाले. 7.30 च्या सुमारास पावसाचा जोर कमी झाल्यावर रस्त्यावरील पाणी उतरणे सुरू झाले.

उत्तर कर्नाटकमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, आणि बंगालच्या उपसागरात तयार होणार्‍या चक्रीय हालचालींमुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यात गुरुवारपासून (दि.8) चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

त्यानुसार 8, 10 आणि 11 रोजी यलो अलर्ट तर उद्या (दि. 9) रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याकाळात वार्‍याचा वेग ताशी 40 ते 65 कि.मी.पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button