गोवा: देवदर्शनाहून परताना काणकोणजवळील अपघात आई-वडिलांसह मुलगा ठार; चारचाकी हवेत उडाली | पुढारी

गोवा: देवदर्शनाहून परताना काणकोणजवळील अपघात आई-वडिलांसह मुलगा ठार; चारचाकी हवेत उडाली

काणकोण : पुढारी वृत्तसेवा देवदर्शनाहून गोव्यात परतताना झालेल्या अपघातात आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले. आंबेनास – राजबाग येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आहेत.

काणकोणमध्ये झालेल्या अपघातात हरिश उल्हास नागेकर (35), त्यांची आई वीणा उल्हास नागेकर (60), वडील उल्हास राम नागेकर (64) हे मृत झाले आहेत. सावी हरिश नागेकर (2), हरशिता हरिश नागेकर (26), समीक्षा नागेकर (26), सुकशता काणकोणकर (3) व साई नागेकर (13) हे जखमी आहेत. हे सर्व उपासनगर, आई-वडिलांसह मुलगा ठार वास्को येथील असून मूळचे माजाळी, कारवारचे रहिवासी असल्याचे काणकोण पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, क्विड गाडी (जीए -06, ई-3979) कारवारहून मडगावच्या दिशेने जात होती. ते कारवार येथून हणकोण येथील श्री सातेरी देवीच्या दर्शन घेऊन येत होते. यावेळी आय टेन गाडी (जीए-07 ई-0265) मडगावहून कारवारच्या दिशेने जात होती. राष्ट्रीय महामार्ग 66 वर आंबेनास – राजबाग येथे आयटेन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्याच्या वाहनाने दुभाजकाला जोरदार धडक दिली. आणि गाडी हवेत फेकली गेली. ही गाडी कारवारहून दुसर्‍या बाजूने येणार्‍या क्विड गाडीवर आदळली.

क्विड गाडीचा चालक व पुढील सिटवर बसलेली व्यक्ती जागीच ठार झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीचे दरवाजे कापून बाहेर काढून काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. अपघातस्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काणकोण पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सगावस यांनी अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास ते करीत आहेत

Back to top button