गोवा : सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांना पर्वणी | पुढारी

गोवा : सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांना पर्वणी

मडगाव;  पुढारी वृत्तसेवा :  सलग चार दिवस सुट्टी मिळाल्याने राज्यात मोठ्या संख्येत पर्यटक दाखल झाले आहेत. सध्या समुद्र खवळलेला असूनही लोक किनार्‍यावर धाव घेऊ लागले आहेत. साळावली धरणावर पर्यटकांची गर्दी झाली असून, मडगाववरून पर्यटक पणजीच्या दिशेने जाऊ लागल्याने कुठ्ठाळीतील रस्ता खोळंबला होता.

शनिवारपासून सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. सलग चार दिवस सुट्टी मिळत असल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येत पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. शुक्रवारी मोठ्या संख्येत पर्यटक गोव्यात दाखल झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. दक्षिण गोव्यात उतरलेल्या पर्यटकांनी थेट कोलवात धाव घेतली. अनेकांना समुद्र खवळल्याची माहिती नव्हती. पोलिसांना कोलवा सर्कलवर त्यांना आडवावे लागले होते. काहींनी तर समुद्र किनार्‍यांवर प्रवेश केला होता. त्यांना आडवेपर्यंत पोलिसांची दमछाक झाली.
साळावली धरणावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले. आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी शनिवारीपासून धरणावर लोकांनी गर्दी केली होती.

पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आलेले अनेक पर्यटक सायंकाळी पणजीत कॅसिनोत दाखल होण्यासाठी गेले. मडगाववरून वेर्णापर्यंत वाहतूक सुरळीत चालली होती. त्यानंतर कुठ्ठाळी जंक्शनवर वास्कोतील वाहतूक येऊन मिळू लागल्याने वर्णा ते आगाशीपर्यंत वाहतूक खोंळबली होती. तीन किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी एक तास लागत होता.

‘सोमवारी स्थिती पूर्वपदावर येईल’
वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक धर्मेंश आंगले यांना विचारले असता ते म्हणाले, चार दिवस सुट्ट्या असल्याने मोठया प्रमाणावर पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या वाहनांमुळे वाहतूक खोळंबा झाला आहे. सोमवारी परिस्थिती पूर्वपदावर येईल.

Back to top button