गोवा : डिजिटल सक्षमीकरणामुळे रोजगाराची संधी सुलभ | पुढारी

गोवा : डिजिटल सक्षमीकरणामुळे रोजगाराची संधी सुलभ

पणजी; तेजश्री कुंभार :  तरुण पिढीकडे असणार्‍या कौशल्याला जर माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर रोजगार उपलब्धीसाठीचा मार्ग तयार होऊ शकतो. हेच ध्येय समोर ठेऊन 18 पेक्षा अधिक वय असणार्‍या गोमंतकीयांना डिजिटली सक्षम करण्याचे काम ‘गोवा लाईव्हलीहूडस फोरम’ ही विनाशासकीय संस्था सध्या जोमाने करीत आहे.

कौशल्य प्रशिक्षण खाते, माहिती तंत्रज्ञान विभाग, मायक्रोसॉफ्ट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर करिअर सर्व्हिस (एनआयसीएस) आणि शिक्षण उच्च संचालनालयाच्या वतीने महाविद्यालये आणि वेगवेगळ्या आस्थपानांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः या डीजी सक्षम- डिजिटल कौशल्य प्रशिक्षण  कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे.

गेल्या एक महिन्यामध्ये हा उपक्रम फोंडा कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि कुंकळ्ळी कॉलेज ऑफ एज्युकेशन अशा दोन ठिकाणी पार पडला. या महाविद्यालयांना भेट देऊन संस्थेच्या सदस्यांनी डिजिटली सक्षमीकरणाबाबत माहिती दिली आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि डिजिटल कौशल्य प्रशिक्षणाचे फायदे स्पष्ट केले जात आहेत. या प्रशिक्षणाचे स्वरूप विस्तारित असल्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्यांचा फायदा समजून घेण्यास मदत होते. व्हिज्युअल प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगितली जात असल्यामुळे विध्यार्थ्यांना ऐकण्यात रुची निर्माण होते.

जुलैमध्ये उच्चशिक्षण संचालयानयातील शिक्षकांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विध्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहचविण्याचा हेतू असल्याचे या उपक्रमाच्या मोबिलायझर निकिता गुप्ता यांनी सांगितले.

नोंदणी अशी करा

या उपक्रमाच्या प्रशिक्षणाची नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर करिअर सर्व्हिस (एनआयसीएस) च्या वेबसाईटवर जाऊन नोकरीबाबत असणार्‍या जॉबसीकर नावाच्या विभागावर क्लिक करा. येथे आवश्यक असणारी माहिती भरली की तुम्हाला एक ओटीपी मिळेल आणि लगेचच तुमच्या नावाची नोंदणी होईल. या वेबसाईटवर रेकॉर्ड करण्यात आलेली व्याख्यानेसुद्धा उपलब्ध आहेत.

मुख्यमंत्र्यांचा मोलाचा हातभार : वेर्णेकर
गोवा लाईव्हलीहूडस फोरमच्या सचिव आशा वेर्णेकर म्हणाल्या, राज्यातील तरुणांनी डिजिटली सक्षम व्हावे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः या उपक्रमामध्ये रस दाखविला आहे. त्यांनी पत्र लिहून त्यांचे मतसुद्धा कळविले आहे. उपक्रमाची सुरुवात हुरूप आणणारी असून पुढे मोठा टप्पा गाठायचा आहे. तरुणांना रोजगार उपलब्धीसाठी या उपक्रमाचा खूप फायदा होणार असल्याने उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांची मोलाची मदत मिळत आहे.

Back to top button