पर्यटकांनो, गोव्यात गैरवर्तन करू नका ; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची सूचना | पुढारी

पर्यटकांनो, गोव्यात गैरवर्तन करू नका ; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची सूचना

पणजी : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यातील किनार्‍यांवर पर्यटकाकडून केल्या जाणार्‍या गैरप्रकारांची दखल घेतली आहे. पर्यटन स्थळांची बदनामी करणारे किंवा पर्यटनाला बाधा आणणारे कृत्य पर्यटकांनी करू नये, अशी सूचना त्यांनी केली आहे.

अलीकडेच उत्तर गोव्यातील समुद्र किनार्‍यावर कार चालवण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यात एक कार पाण्यात बुडाली होती. हा प्रकार समाजमाध्यमातून देशपातळीवर पोहोचला. केंद्रीय मंत्री रिजिजू यांना या गोष्टीची दखल घेऊन नुकतेच ट्वीट केले आहे. त्यात पर्यटनस्थळाला भेट देणार्‍या लोकांच्या अनुशासनहीन आणि अयोग्य वर्तनाचा निषेध केला आहे. गोव्यातील पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनाचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिजिजू यांनी हे ट्वीट केले आहे.

पर्यटन स्थळावर पर्यटक फिरण्यासाठी येतात. वाहने चालवण्यासाठी नव्हे. किनार्‍यावर कार चालवून पर्यावरण धोक्यात आणणे आणि नको त्या गोष्टी करणे हे निषिद्ध आहे. अशा अनैतिक गोष्टींना थारा असता कामा नये. पर्यटकांनी आपल्या देशाचे सौंदर्य खराब करू नये आणि स्थानिक भावनांचा आदर राखावा. प्रत्येकाने आपणजबाबदार नागरिक आहोत, याचे भान ठेवावे, असेही रिजिजू़ यांनी म्हटले आहे.

पर्यटकांची मस्ती सुरूच

राज्यात येणारे पर्यटक रेंट अ कार किवा रेंट अ बाईक घेऊन फिरतात. मात्र ते वाहतूक नियम पाळत नाहीत. पोर्ट आग्वादा येथील रस्त्यावर रविवारी रेंट अ कारमध्ये आठ व्यक्ती बसून प्रवास करत होत्या. त्यातील दोघेजन कारची डिक्की वर करुन मागे पाय सोडून प्रवास करत होते.

Back to top button