“आप” ने आधी स्वतःच्या राज्यांबाबत बोलावे : सुदिन ढवळीकर | पुढारी

"आप" ने आधी स्वतःच्या राज्यांबाबत बोलावे : सुदिन ढवळीकर

पणजी , पुढारी वृत्तसेवा :  माझ्यावर टीका करण्याआधी आम आदमी पक्षाने त्यांचे सरकार असणार्‍या पंजाबमधील वीज टंचाईबाबत बोलावे असा सल्ला विजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी दिला. तमनारवरून ढवळीकरांनी यु टर्न मारला अशी टीका करणार्‍या आम आदमी पक्षाला त्यांनी प्रत्युत्तर दिले.

ढवळीकर म्हणाले की, मागच्या विधानसभेत मी भाषण करताना तमनारला कधीच विरोध केला नव्हता. मी फक्त वीज वाहिनीच्या मार्गाला विरोध केला होता. त्या मार्गावरून वीज आणली असती तर हजारो झाडे कापावी लागली असती. त्यामुळे पर्यवरणाचे नुकसान होणार होते. म्हणून मी सुपातून फोंड्यात येणार्‍या समांतर वाहिनीचा पर्याय सुचविला होता. सर्वोच्च न्यायालयानेही याच समांतर मार्गाचा अवलंब करावा असा आदेश दिला आहे.

तमनार प्रकरणात आप मागे पडल्याने आता ते काहीही बोलत आहेत. त्यांनी माझ्यावर टीका करण्याआधी मी नेमके काय बोललो होतो ते जाणून घ्यायला पाहिजे होते. आज पंजाबमध्ये वीज टंचाई निर्माण झाली आहे. तेथील प्रशासनाने उद्योजकांना बोलवून रात्री वीज मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. याउलट आम्ही कुठेही भारनियमन न करता बाजारभावाने वीज खरेदीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button