कुख्यात गुंड अन्वर याचा सावनूर येथे भर रस्त्यावर निर्घृण खून | पुढारी

कुख्यात गुंड अन्वर याचा सावनूर येथे भर रस्त्यावर निर्घृण खून

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : बलात्कार, अपहरण, खंडणी, खुनी हल्ला अशा अनेक गुन्ह्यांतून गोव्यात दहशत निर्माण केलेला कुख्यात गुंड अन्वर ऊर्फ अन्वर शेख याचा रविवारी त्याच्या मूळ गावी सावनूर (हावेरी, कर्नाटक) येथे भर रस्त्यावर निर्घृण खून करण्यात आला आहे.

अन्वर याने दोन दिवसांपूर्वी सावनूर येथे व्यवसायाने मॅकेनिक असलेल्या युवकाची दुचाकी जाळली होती. त्याची खंडणीसाठी त्याने सतावणूक चालवली होती.

रविवारी सायंकाळी अन्वर त्याचा गेम करण्यासाठी गेला असता त्यानेच अन्वरच्या मानेवर कुर्‍हाडीने घाव घालून त्याला रस्त्यावरच संपवले. घटना स्थळावरून एकाला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत आणखी चार जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती.

कुख्यात गुंड अन्वर याच्यावर 16 फेब्रुवारी रोजी आर्लें येथे खुनी हल्ला झाला होता. त्याच्या पायाला गोळी लागली होती. सदर घटना घडूनही त्याने आपली गुन्हेगारी वृत्ती सोडली नव्हती. इस्पितळातून परतल्यावर त्याच्यावर एका राजकीय कार्यकर्त्याला जीवे

मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंद झाला होता. केपे बलात्कार प्रकरणात तो नुकताच तुरुंगात जाऊन आला होता. आपल्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याने पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकीनऊ आणले होते.त्याच्यावर तडीपारीची सुनावणी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांसमोर न्यायप्रविष्ट आहे.

खुनानंतर संशयित घटनास्थळीच

अन्वरला ठार मारल्यानंतर संशयित कुर्‍हाड घेऊन तिथेच उभा राहिला. पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर त्याने ती कुर्‍हाड त्यांच्या ताब्यात दिली. यावेळी संतप्त जमावाकडून त्याची मारुती गाडी फोडण्यात आली.

खंडणीवरून वाद; सोशल मीडियातून आव्हान प्राप्त माहितीनुसार, गोवा नोंदणीकृत असलेली जी ए 07 एल 2886 क्रमांकाची मारुती स्विफ्ट घेऊन अन्वर सावनूर येथे गेला होता. तिथे ही घटना घडली. अन्वरने एका मेकॅनिकची पल्सर दुचाकी दोन दिवसांपूर्वी जाळली होती. त्याने खंडणी देण्यास नकार केल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता.संबंधित मॅकेनिकचा सावनूर येथे गॅरेजचा व्यवसाय आहे. त्याला आणखी चार भाऊ आहेत.

अन्वरने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तुला आपण जीवे मारणार, असा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर प्रसृत केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यानेही त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान दिले होते. रविवारी अन्वर त्याला मारण्यासाठी सावनूर येथे गेला असता त्याने कुर्‍हाडीने अन्वरचाच खात्मा केला.

Back to top button