बॉम्ब अफवा : गटारीच्या पार्टीत दारु ढोसली आणि बॉम्ब ठेवल्याचा फोन केला! | पुढारी

बॉम्ब अफवा : गटारीच्या पार्टीत दारु ढोसली आणि बॉम्ब ठेवल्याचा फोन केला!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (सीएसएमटी) भायखळा आणि दादर रेल्वे स्थानकासह बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्याजवळ बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या कॉलमुळे शुक्रवारी रात्री शहरात एकच खळबळ उडाली.

मात्र ती अफवा ठरली. गटारीच्या पार्टीतून हा कॉल करणार्‍या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शुक्रवारी रात्री 08 वाजून 53 मिनिटांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये एक कॉल आला.

सीएसएमटी, भायखळा आणि दादर रेल्वे स्थानकासह अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगला या चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती देऊन कॉल कट झाला. बॉम्बशोधक व नाशक पथके श्वान पथकांनी सीएसएमटी, भायखळा आणि दादर रेल्वे स्थानकात धाव
घेत लोकल्स, तिकीट घरे, वेटिंग हॉल, सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉल असा स्थानकांचा काना कोपरा तपासला.

जुहूमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळचा परिसर तपासला. मात्र काही सापडले नाही. दुसरीकडे नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांनी ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला पुन्हा फोन लावला. माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला
डिस्टर्ब करु नका, असे म्हणत त्याने फोन बंद करुन ठेवला.

पोलिसांनी मग लोकेशन काढून त्याचा शोध सुरू केला. कल्याण शिळफाटा येथून रमेश शिरसाट, राजू कांगणे आणि गणेश शेळके या तीन जणांना ताब्यात घेतले. डोंबिवलीमधील हे तरुण गटारीची पार्टी करत होते. मद्यधुंद अवस्थेत हा कॉल केल्याची कबुली त्यांनी दिली.

हे ही वाचलं का?

Back to top button