सांगलीच्या उर्वीने केला ट्रेकींगचा विक्रम | पुढारी

सांगलीच्या उर्वीने केला ट्रेकींगचा विक्रम

मालयातील शिवालिक रेंजमधील 13 हजार 800 फुटावरील काळाकुट्ट भोवताल, उने 8 अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्याच वेगाने होणारी बर्फवृष्टी, कडाडणार्‍या विजा अशा पार्श्वभूमीवर मुळच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील व सध्या गोव्यात वास्तव्य करणार्‍या उर्वी अनिल पाटील या 10 वर्षाच्या मुलीने सरपास हे शिखर सर केले आहे. एवढ्या लहान वयात शिखर सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय मुलगी ठरली आहे.

विक्रमाविषयी माहिती  देताना ती म्हणाली, आमच्या सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कँपवरून 4 मे 2018 पासून झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे- छोटे ट्रेक केले. पुढे 7 मे पासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. कसोल हा 6 हजार 500 फुटावरचा बेस कँप आहे. पुढे ग्राहण (7600 फूट) पद्री (9300 फूट) मिन्थाज  (11200फूट) नगारू (12500 फूट) बिस्करी (11000 फूट) आणि बंधकथाज (8000 फूट) असे कँप होते. 

असे सर केले अवघड सरपास शिखर

नगारु ते बिस्करी या कँप दरम्यान सरपास हे 13 हजार 800 फुटांवरील शिखर आहे आणि हे शिखर ट्रेकींगसाठी अत्यंत अवघड मानले जाते. साधारणपणे 14 कि.मी. चा संपूर्ण प्रवास बर्फातील असून अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात पहाटे 2 वाजता होते. चहा आणि गरम पाण्याबरोबर गूळ व फुटाणे हा अल्पोपहार करून मी ट्रेकींगला सुरुवात केली. मात्र, याच वेळेस वातारण अचनाक बिघडले आणि बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याचे उर्वीने सांगितले. अशाही परिस्थितीत ट्रेक करण्याची सूचना कँप लिडर यांनी दिल्याने पुन्हा पहाटे 3.15 वाजता ट्रेकींगला सुरुवात झाली. 200 मीटरच्या अत्यंत अवघड चढाईनंतर सरपासच्या पठाराला सुरुवात झाली. 14 मे 2018 ला पठारावर पोहचल्याने सरपास सर केल्याचा आनंद मोठा होता. माझ्यासारख्या  लहानग्या मुलीसाठी ही खूप मोठी उपलब्धीही होती.

अशीही रिक्स स्वीकारली होती 

मुळात सरपास या शिखराच्या ट्रेकींगसाठी युथ होस्टेल असोशिएशन ऑफ इंडिया या आयोजक संस्थेने ट्रेकींगची वयोमर्यादा 15 वर्ष ठेवली आहे. यात मी जेमतेम 10 वर्षाची असल्याने मला ही संधी मिळणार नव्हती. पण माझा निर्धार ठाम होता. त्यामुळे  हा ट्रेक करण्याचे ठरविले. माझ्या वडीलांनी या संस्थेला सहमतीपत्र लिहून दिले आणि मला सरपासकडे मोर्चा वळविण्याची रितसर परवानगी मिळाली. 

अशी केली तयारी   

हिमालयातील सरपास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक व शारीरिक तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रीत केले. सकाळी दीड तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे  व  अर्धातास  योगा व  व्यायाम करायचे. आहारामध्ये प्रामुख्याने सीफूड व सुकामेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची कपडे, गॉगल,  ट्रेकींग   बूट, स्टीकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वीने सांगितले. 

 -दिलीप जाधव, मळणगाव 

Back to top button